कोपरगाव : तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून वाळूची तसेच इतर गौण खनिजाची २०१४ ते २०१९ या कालावधीत तहसीलच्या वाळू चोरी विरोधी पथकांनी अवैद्यरित्या वाहतूक करणाऱ्या ३३ वाहनांची जप्ती करून मालकावर दंडात्मक कारवाई केली होती. या जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.
या कारवाईतील वाहनांच्या मालकांनी १ कोटी १३ लाख २७ हजार ८०० रुपये इतकी दंडाची रक्कम शासनास जमा केलेली नाही. लिलावातील वाहनामध्ये २ जेसीबी मशीन, ७ डंपर, २ ट्रक, २१ ट्रॅक्टर तर १ पिकअप टेम्पोचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व वाहनांचा २ मार्च रोजी सकाळी ११ वाजता कोपरगाव तहसील कार्यालयात लिलाव करण्यात येणार आहे, असेही चंद्रे यांनी सांगितले.