नातेवाईकांना देण्यासाठी नगरहून चोरली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:16 IST2021-06-06T04:16:36+5:302021-06-06T04:16:36+5:30

बीड : अहमदनगर जिल्ह्यातील एका आरोग्य कर्मचाऱ्याने आपल्या नातेवाईकांना देण्यासाठी चक्क आरोग्य केंद्रातील लस चोरून आणल्याचे समोर आले आहे. ...

Vaccine stolen from town to give to relatives | नातेवाईकांना देण्यासाठी नगरहून चोरली लस

नातेवाईकांना देण्यासाठी नगरहून चोरली लस

बीड : अहमदनगर जिल्ह्यातील एका आरोग्य कर्मचाऱ्याने आपल्या नातेवाईकांना देण्यासाठी चक्क आरोग्य केंद्रातील लस चोरून आणल्याचे समोर आले आहे. आष्टी तालुक्यातील कडा आरोग्य केंद्रात लस देताना हा प्रकार उघड झाला. आता या आरोग्य कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रकाराने मात्र लसींचा काळाबाजार कसा होतो, हे उघड झाले आहे.

विठ्ठल खेडकर हा आरोग्य कर्मचारी कर्जत तालुक्यातील चापडगाव आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. शनिवारी त्याने लसीची एक कुपी चोरून कडा आरोग्य केंद्रात आला. येथे आपल्या सहा नातेवाईकांना लस देण्यास सांगितले. परंतु हा प्रकार गंभीर असल्याने कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी यांना सांगितला. त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांना हा प्रकार सांगितला. यावर त्यांनी तत्काळ या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, लस देण्यासाठी आणलेले नातेवाईक आणि संबंधित खेडकर नामक कर्मचाऱ्याने घातलेला गोंधळ हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यानिमित्ताने आरोग्य कर्मचाऱ्यांकडून होत असलेला गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. आता या प्रकरणात काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

---नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क

या गंभीर प्रकाराबाबत अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना संपर्क केला. यावर त्यांनी ही बाब जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी बोला, असे सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे म्हणाले, ही बाब गंभीर आहे. याची लगेच चौकशी करतो. हे जर खरे असेल तर तत्काळ कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल. मी पालकमंत्री यांच्या बैठकीत आहे, नंतर सविस्तर बोलतो.

-----------

कडा आरोग्य केंद्रातील प्रकार समजला आहे. ही बाब गंभीर असून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. असे कोणी चूक करत असेल तर त्याला पाठीशी घातले जाणार नाही.

डॉ. आर.बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

---

Web Title: Vaccine stolen from town to give to relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.