तीन दिवसांपासून येईना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:20 IST2021-04-24T04:20:55+5:302021-04-24T04:20:55+5:30
नगर जिल्ह्यासाठी लागणारी कोरोना प्रतिबंधक लस पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट (कोविशिल्ड) तसेच भारत बायोटेककडून (कोव्हॅक्सिन) येते. आतापर्यंत ३ लाख ...

तीन दिवसांपासून येईना लस
नगर जिल्ह्यासाठी लागणारी कोरोना प्रतिबंधक लस पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट (कोविशिल्ड) तसेच भारत बायोटेककडून (कोव्हॅक्सिन) येते. आतापर्यंत ३ लाख ३४ हजार ४०० डोस कोविशिल्ड, तर ७३ हजार ९८० डोस कोव्हॅक्सिनचे नगर जिल्ह्यासाठी प्राप्त झाले आहेत. २० एप्रिलला अखेरचे २२ हजार ३१० डोस प्राप्त झाले होते. ते डोस त्यादिवशी लसीकरण केंद्रांना वाटप करण्यात. त्यानंतर मात्र अद्यापपर्यंत लसीचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे ग्रामीणसह नगर शहरातील बरीचशी केंद्र शुक्रवारी बंद होती. अनेक नागरिक केंद्रावर लसीकरणासाठी येत होते. मात्र, लस उपलब्ध नसल्याचे कारण त्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांकडून देण्यात येत होते. त्यामुळे अनेक नागरिकांचा हिरमोड झाला. जेवढे काही डोस ग्रामीण भागात शिल्लक होते, ते शुक्रवारी वाटप करण्यात आले. नगर शहरातील लसीकरण केंद्रांवर शुक्रवारी लस नव्हती. त्यामुळे ही केंद्र बंद होती.
दरम्यान, लसीकरणासाठी आता नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे; परंतु मागणीएवढा लसींचा पुरवठा होत नसल्याने अनेक ठिकाणी अडचण येत आहे. आरोग्य विभागही लसीकरणासाठी मोठा पुढाकार घेत आहे; परंतु लस उपलब्ध होत नसल्याने त्यांचाही नाइलाज होत आहे.
१ मेपासून अठरा वर्षांपुढील सर्वांना लसीकरण सुरू होणार आहे. मात्र, पुरवठा असाच मर्यादित राहिला तर गोंधळ उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
--------------
लसीकरण केंद्रावर बेशिस्त
एरवी लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होते. नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळताना दिसत नाहीत. आरोग्य कर्मचारी या बेशिस्तीसमोर हतबल होतात. त्यामुळे नागरिकांनी शिस्त पाळून लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
-----------------
आतापर्यंत प्राप्त लस
कोविशिल्ड -३३४४००
कोव्हॅक्सिन-७३९८०
एकूण - ४०८३८०
---------------------------
लष्कराला २४८७० डोस
सीरम इन्स्टिट्यूटकडून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे कोविशिल्ड लस आल्यानंतर त्यातील २४ हजार ८७० डोस लष्कराला देण्यात आले आहेत.
-----------------
वरिष्ठ पातळीवरून गेल्या तीन दिवसांपासून नगर जिल्ह्याला लस प्राप्त झालेली नाही. २० एप्रिलला अखेरची लस आली होती. पुढील लस आल्यानंतर केंद्रांना वाटप केली जाईल.
- डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी