लसीचा उडाला बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:16 IST2021-07-11T04:16:25+5:302021-07-11T04:16:25+5:30
बेलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध नसल्याने लसीकरण होणार नसल्याचे आरोग्य केंद्राने जाहीर केले होते. त्यामुळे ग्रामस्थ लसीकरण ...

लसीचा उडाला बोजवारा
बेलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध नसल्याने लसीकरण होणार नसल्याचे आरोग्य केंद्राने जाहीर केले होते. त्यामुळे ग्रामस्थ लसीकरण केंद्राकडे फिरकले नाहीत. तथापि, प्रत्यक्षात आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनी लस आल्याबाबत ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांना अंधारात ठेवून परस्पर ठरावीक लोकांना फोन करून बोलावून लसीकरण सुरू केले. याची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, ज्येष्ठ नेते सुनील मुथा, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, माजी सरपंच भरत साळुंके, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख, भाऊ डाकले, विशाल आंबेकर आदी केंद्रावर पोहोचले. त्यांनी तुम्ही टोकन पध्दती बदलून परस्पर आपल्या मर्जीने ग्रामस्थांना अंधारात ठेवून लसीकरण सुरू का केले, याबाबत जाब विचारला. मुथा व आधिकाऱ्यांत वाद झाले.
मुथा यावेळी संतप्त झाले. नवले, साळवी, खंडागळे यांनीही याबाबत आक्षेप घेतला. असे असेल तर तुमच्याच पध्दतीने लसीकरण करा, अशी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केली. अधिकाऱ्यांनी झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. उपस्थित नेते मात्र यावर समाधानी नव्हते. मुथा यांनी आरोग्य केंद्रातील काही व्यक्ती लसीकरणासाठी पैसे घेतात असा आरोप केला. आपला संताप व्यक्त करून ते तेथून निघून गेले. ही बाब समजल्यावर केंद्रावर एकच गोंधळ उडाला. अधिकाऱ्यांनी लसीकरणाबाबत ग्रामस्थांची दिशाभूल केली. टोकन पध्दतीने योग्य नियोजन यापूर्वी यशस्वी झालेले असताना ही पध्दत डावलून अधिकाऱ्यांनी मनमानी केली. या मनमानीमुळे लसीकरणाचा बोजवारा उडाला. झाल्या प्रकाराबद्दल शरद नवले, सुनील मुथा, महेंद्र साळवी, अभिषेक खंडागळे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. या प्रकाराबद्दल आणि अधिकाऱ्यांच्या मनमानीबद्दल ग्रामस्थांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
---------------
केंद्राच्या अधिकाऱ्यांनी लसीकरणाबाबत जाणीवपूर्वक घोळ केला. आधी लस नाही, असे सांगून ऐनवेळी ठरावीक लोकांना लसीकरणासाठी बोलविणे संशयास्पद आहे. आरोग्य केंद्रातील काही व्यक्ती पैसे घेऊन लसीकरण करतात असा आरोप सुनील मुथा यांनी केला आहे.