लोकमत न्यूज नेटवर्क
करंजी (जि. अहमदनगर) : येथील आरोग्य उपकेंद्रात लसीकरण चालू असताना समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश गोवर्धन शेळके (वय ४०) यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. ६) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. तालुका आरोग्याधिकारी डॉ. भगवान दराडे, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे शेळके यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलेले आहे.
करंजी (ता. पाथर्डी) येथील आरोग्य उपकेंद्रात मंगळवारी लसीकरण चालू होते. त्यामुळे परिसरातील नर्स व आशा सेविकाही आरोग्य केंद्रात हजर होत्या. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास डॉ. गणेश शेळके (रा. बहिरवाडी, ता. नेवासा, जि. अहमदनगर) यांनी केंद्रातील कर्मचाऱ्यांकडे नोकरीचा राजीनामा द्यायचा आहे, असे सांगत कागद व पेन मागितला. त्यानंतर ते एका खोलीत जाऊन खोलीचा दरवाजा आतून बंद करून पंख्याला गळफास घेतला. काही वेळाने नर्स व इतर कर्मचाऱ्यांनी दरवाजा वाजवून आवाज दिला. परंतु आवाज येत नसल्याने त्यांनी आरडाओरड केली. वरिष्ठांना माहिती दिली. तालुका आरोग्याधिकारी डॉ. भगवान दराडे, तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी डॉ. होडशीळ तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह खाली उतरविल्यानंतर शेळके यांच्या हातात एक सुसाईड नोट आढळून आली. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह नगर जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन करण्यात आलेले नव्हते. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कौशल्य वाघ हे करीत आहेत. मयत डॉ. शेळके यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
....................
कॉन्ट्रॅक्टवर काम, पगार तुटपुंजा
कॉन्ट्रॅक्टवर काम, पगार तुटपुंजा आणि कामाचा प्रचंड भार अशा अवस्थेत गेल्या दोन वर्षांपासून डॉ. गणेश शेळके हे आरोग्य विभागात काम करीत होते. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचा पगारही झालेला नव्हता. त्यामुळे ते नैराश्यात होते, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
..................
चिठ्ठीत लिहिले - मी आत्महत्या करतो कारण..
आत्महत्या करण्यापूर्वी डॉ. शेळके यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. ही चिठ्ठी त्यांच्या हातातच होती. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान दराडे, तहसीलदार, कलेक्टर व प्रशासनातील वरिष्ठांच्या जाचास कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे या चिठ्ठीत डॉ. शेळके यांनी नमूद केले आहे. तसेच वेळेवर पेमेंट न करणे, अतिरिक्त कामाचा भार टाकणे, पेमेंट कपातीच्या धमक्या देणे यामुळे आत्महत्या करीत आहे, असा उल्लेख चिठ्ठीत आहे.
................
समुदाय वैद्यकीय अधिकारी यांच्या आत्महत्येशी माझा काहीही संबंध नाही. मयत हे कौटुंबिक वादामुळे मानसिक दडपणाखाली होते. सकाळी पगाराबाबत फोन आला होता. परंतु लेखापाल आजारी असल्याने ते दोन महिन्यांपासून रजेवर होते. त्यामुळे पगार झाले नाहीत. मयताने फायनान्सवर गाडी घेतली होती. त्यामुळे त्यांना फायनान्सवाले त्रास देत होते.
- भगवान दराडे, तालुका आरोग्य अधिकारी
.....................
मयत वैद्यकीय अधिकारी हे माझे कर्मचारी नाहीत. त्यामुळे माझा त्यांच्याशी कोणत्याही कामाचा संबंध येत नाही. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचा माझाशी काहीही संबंध नाही.
- शाम वाडकर, तहसीलदार, पाथर्डी
...............
डॉ. शेळके यांच्या आत्महत्येस जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही.
-ज्ञानेश्वर दुकळे, मयत शेळके यांचे नातेवाईक