लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दुष्परिणाम नाही. शहरी भागातील नागरिकांच्या व ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या मनात लसीकरणाविषयी असलेली भीती, झालेला गैरसमज दूर करण्यासाठी संगमनेरातील जेष्ठ शिक्षक व तरूणांनी एकत्र येऊन गीतातून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाविषयी प्रबोधन केले आहे.
सर्वत्र लसीकरण जोरात सुरु आहे. मात्र, अजूनही अनेकांच्या मनात लसीकरणाविषयी भीती वाटत आहे. लसीकरण मोहिमेला गैरसमजातून अडथळा ठरू लागला आहे. हा गैरसमज दूर करण्यासाठी जेष्ठ शिक्षक व तरुणांनी एकत्र येऊन गीतातून प्रबोधन केले आहे. ‘लस असे ही संजीवनी, घ्या हो लसीकरण करोनी’ असे या गीताचे बोल आहेत.
सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाजाच्या भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयातील इंग्रजी विषयाचे शिक्षक आर. के. राहणे यांना गायनाची विशेष आवड असून त्यांनी अनेक गीते लिहून ती स्वत: गायली आहेत. त्यात प्रबोधनात्मक, सामाजिक, पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या, देशभक्तीपर अशा अनेक गीतांचा समावेश आहे. सहकारमहर्षी, स्वातंत्र्यसैनिक दिवगंत भाऊसाहेब थोरात यांचा जीवनपट देखील राहणे यांनी शब्दबद्ध केला आहे.
घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय तसेच संगमनेर शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात या गीताचे चित्रीकरण केले आहे. जेष्ठ रंगकर्मी वसंत बंदावणे यांनी दिग्दर्शन केले आहे. संगीत साथ सत्यजित सराफ व भोला सस्कर यांची लाभली आहे. तर छायाचित्रण अनिल कोल्हे यांनी केले आहे. रहाणे व बंदावणे हे दोघेही शिक्षक असून त्यांना सराफ, सस्कर व कोल्हे या तरुणांची साथ लाभली आहे.
-------------------
आपण सर्वांनी आपले लसीकरण करून घ्यायचे आहे. तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालय व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत येणारी उपकेंद्र येथे लसीकरण करण्यात येत आहे. रोहिदास राहणे व वसंत बंदावणे यांच्या गीतातून निश्चित जनजागृती होईल.
- अमोल निकम, तहसीलदार, संगमनेर
------------
लसीकरणाची मोहीम केंद्र शासनाने सुरू केलेली आहे. तरी सर्वांनी लसीकरण करून घ्यावे. मात्र, लसीकरणासाठी येताना शारीरिक अंतराचे नियम पाळावेत. मास्क लावावा. सॅनिटायझरचा वापर करावा. प्रशासनाला साथ द्यावी.
- डॉ. संदीप कचेरिया, वैद्यकीय अधिकारी, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय, संगमनेर