जिल्ह्यातील २० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना देणार लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:37 IST2020-12-15T04:37:01+5:302020-12-15T04:37:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्हा आरोग्य यंत्रणेतील १५ हजार शासकीय अधिकारी, कर्मचारी, आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविकांसह खासगी रुग्णालयातील ...

जिल्ह्यातील २० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना देणार लस
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्हा आरोग्य यंत्रणेतील १५ हजार शासकीय अधिकारी, कर्मचारी, आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविकांसह खासगी रुग्णालयातील ५ हजार डॉक्टर्स, कर्मचारी अशा एकूण २० हजार जणांना पहिल्यांदा कोरोनाला प्रतिबंध करणारी लस दिली जाणार आहे. एका व्यक्तीला दोनवेळा ही लस दिली जाणार आहे. लसीकरणासाठी राज्य शासनाने तयार केलेल्या को-वीन (कोरोनावरील विजय) पोर्टलवर आतापर्यंत जिल्ह्यातील १५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आली आहे. जानेवारीमध्ये ही लस आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालयाने लसीकरणाचा संपूर्ण आराखडा तयार
केला आहे.कोरोनावरील लस आता जानेवारीमध्ये उपलब्ध होणार आहे. सर्वात आधी ही लस आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, आरोग्य सेवक, आशा कर्मचारी यांना दिली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालयाने आराखडा तयार केला आहे. यामध्ये जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. नाशिक येथून ही लस नगरला मिळणार आहे. ती लस जिल्ह्यातील १३४ केंद्रावर देण्यात येईल. तेथून ती लस कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. त्यासाठी आधी ९३६ जणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे कर्मचारी २० हजार जणांना लस देणार आहेत, अशी माहिती लसीकरण मोहिमेचे नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी दिली.
---------
अशी आहे तयारी
सरकारी अधिकारी-कर्मचारी- १५९३७
खासगी दवाखाने - १३२४
खासगी कर्मचारी-५०००
लस वहनासाठी व्हॉक्सिन व्हॉन- २
लस ठेवण्यासाठीचे शीतगृह -२
आरोग्य केंद्र-१३४
प्रशिक्षित कर्मचारी-९३३
----------------
अशी येईल लस
सरकारने लसीकरणासाठी ‘को-विन’ हे पोर्टल तयार केले आहे. जिल्हा प्रशासनाने तयार केलेली यादी, आकडेवारी या पोर्टलवर अपलोड करण्यात येईल. त्यानुसार राज्याची आकडेवारी केंद्राकडे जाईल. जिल्ह्यासाठी नाशिक येथून लस उपलब्ध होईल. तेथून लस आणण्यासाठी दोन व्हॉक्सिन व्हॉन तयार करण्यात आल्या आहेत. जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील शीतगृहात ही लस ठेवण्यात येईल. तेथून ही लस जिल्ह्यातील आरोंग्य केंद्रांना पाठविण्यात येईल. प्रत्येक केंद्रावर विशिष्ट तापमानात लस ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथून ही लस अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिली जाईल. लस देण्यासाठी आधी ९३३ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
-------------
जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस देण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. लस देणाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. पहिल्या टप्प्यात किती जणांना लस दिली जाईल, हे मिळणाऱ्या लसीच्या संख्येवर अवलंबून असेल आणि त्याचे वेळापत्रकही तयार करण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णालये त्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत. पोर्टलवर सध्या १५ हजार जणांची यादी अपलोड केली आहे. मात्र २० हजारापर्यंत ही संख्या जाईल.
-डॉ. सुनील पोखरणा, नोडल अधिकारी, लसीकरण मोहीम तथा जिल्हा शल्य चिकित्सक
-------------