नगरमध्ये २ हजार महावितरण कर्मचाऱ्यांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST2021-06-29T04:15:36+5:302021-06-29T04:15:36+5:30

येत्या पंधरवड्यात उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना ...

Vaccination of 2000 MSEDCL employees in the town | नगरमध्ये २ हजार महावितरण कर्मचाऱ्यांचे लसीकरण

नगरमध्ये २ हजार महावितरण कर्मचाऱ्यांचे लसीकरण

येत्या पंधरवड्यात उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. गेल्या दीड वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अहोरात्र व अविश्रांत वीज सेवा देणाऱ्या महावितरणच्या नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी महावितरणच्या व्यवस्थापनाकडून विशेष प्रयत्न सुरु आहेत. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून स्वतः संपर्क साधला आहे. त्यामुळे आतापर्यंत ३४ जिल्ह्यांमध्ये वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्स प्रमाणे दर्जा देण्यात आला आहे. त्याचा लसीकरणासाठी मोठा फायदा झाला आहे.

महावितरणमध्ये कार्यरत ७५ हजार ३२३ पैकी आतापर्यंत ५९ हजार ७९९ (७९.४ टक्के) नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक बारामती परिमंडलात ९१.२ टक्के तर पुणे व कोल्हापूर- ८७.८४ टक्के, कल्याण- ८५.९ टक्के, औरंगाबाद- ८४.१ टक्के, कोकण- ८२.२ टक्के, भांडूप- ८१.५ टक्के, नांदेड- ८०.९ टक्के, जळगाव- ८०.२ टक्के, अमरावती- ७७.९ टक्के, नागपूर- ७४ टक्के, अकोला- ७३.२ टक्के, नाशिक- ७३.५ टक्के, चंद्रपूर- ७१.५ टक्के, गोदिंया- ७०.४ टक्के आणि लातूर परिमंडलामध्ये ६५.९ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

एक महिन्यापूर्वी महावितरणमधील सुमारे ४७ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले होते. मात्र, वीज कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामे हे आरोग्य व पोलीस विभागाप्रमाणेच अत्यावश्यक असल्याने कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करण्याचे तसेच परिमंडल समन्वय कक्षाचा दैनंदिन आढावा घेण्याचे निर्देश क्षेत्रीय मुख्य अभियंत्यांना देण्यात आले. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी स्वतः याकामी पुढाकार घेत थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रयत्न सुरु केले. परिणामी लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या महिन्याभरात ७९.४ टक्क्यांवर गेली आहे. तसेच आतापर्यंत ४ हजार ५८ कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देखील देण्यात आला आहे. दुसऱ्या डोससाठी निश्चित केलेल्या मुदतीनुसार लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे.

नगर जिल्ह्यात ३ हजार ३१९ कायम व कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यापैकी २०८७ कर्मचाऱ्यांनी लस घेतली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन येत्या १५ दिवसांमध्ये उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना महावितरणकडून देण्यात आल्या आहेत.

Web Title: Vaccination of 2000 MSEDCL employees in the town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.