राज्य मार्गावरील खड्डे दुरुस्तीसाठी मुरूम, मातीचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:35 IST2020-12-16T04:35:43+5:302020-12-16T04:35:43+5:30
कोपरगाव : कोपरगाव- श्रीरामपूर या राज्यमार्ग ३६ वर समृद्धी महामार्गाच्या डंपरच्या अवजड वाहतुकीमुळे पडलेले खड्डे दुरुस्तीसाठी समृद्धीच्या ठेकेदाराने चक्क ...

राज्य मार्गावरील खड्डे दुरुस्तीसाठी मुरूम, मातीचा वापर
कोपरगाव : कोपरगाव- श्रीरामपूर या राज्यमार्ग ३६ वर समृद्धी महामार्गाच्या डंपरच्या अवजड वाहतुकीमुळे पडलेले खड्डे दुरुस्तीसाठी समृद्धीच्या ठेकेदाराने चक्क माती मुरुमाचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या माती- मुरुमामुळे मोठ्या प्रमाणात अपघाताला सुरुवात झाली आहे.
कोपरगाव तालुक्यातील दहा गावांत समृद्धी महामार्गाच्या भरावासाठी याच गावांच्या परिसरातून डंपरच्या साह्याने मुरूम, मातीची वाहतूक केली जात आहे. सध्या कोकमठाण परिसरात याच महामार्गासाठी भराव टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी लागणाऱ्या माती, मुरमाची कोपरगाव- श्रीरामपूर या राज्यमार्गावरून डंपरच्या साह्याने वाहतूक सुरू आहे. अवजड वाहतुकीमुळे या मार्गाची मोठमोठे खड्डे पडून पूर्णतः वाट लागली आहे. मध्यंतरी बांधकाम विभागामार्फत हे खड्डे डांबर व खडीचा वापर करून बुजविण्यात आले होते; परंतु अवजड वाहतुकीमुळे काही तासांत या दुरुस्त केलेल्या खड्ड्यांची वाट लागली होती. आत्ता या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी ठेकेदाराने खडीमिश्रित मातीचा वापर केला आहे. त्यामुळे संपूर्ण डांबरी रस्त्यावर खडीच खडी झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.व यातून अपघातही घडत आहेत.
विशेष म्हणजे, राज्यमार्गाचा दर्जा असलेल्या डांबरी रस्त्यावर दररोज हजारोंच्या संख्येत वाहनांची वर्दळ असते. अशा रस्त्यावर थेट मुरूम, मातीचा वापर करून खड्डे बुजविताना संबंधित ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेतली होती का? आणि जर परवानगी घेतलीच असेल, तर संबंधित विभागाने माती, मुरूम टाकण्याची परवानगी दिली होती की, संबंधित ठेकेदाराने सर्व नियम पायदळी तुडवत स्वतःच्या मर्जीनेच या राज्यमार्गावर माती, मुरूम टाकण्याचा खोडसाळपणा केला आहे? आणि जर केलाच असेल, तर संबंधित बांधकाम विभाग या ठेकेदारावर कारवाई करणार का? असा प्रश्न या निमित्ताने प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.
.......
सर्वसामान्यांचा जीव टांगणीला
मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावरून मोठ्याच लोकांची सर्वाधिक वर्दळ असणार आहे. मात्र, हे काम करण्यासाठी स्थानिक पातळीवरील सर्वच रस्त्यांची अवजड वाहतुकीमुळे आधीच वाट लागली आहे. त्यातच आता डांबरी रस्त्यावर थेट माती, मुरमाचा वापर करून सर्वसामान्य जनतेच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे मोठ्यांच्या सोयीसाठी सुरू असलेल्या महामार्गाच्या परिसरात सर्वसामान्यांचा जीव टांगणीलाच लागलेला आहे.
..........
कोपरगाव- श्रीरामपूर राज्यमार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी माती, मुरमाचा वापर करण्यात आला आहे.
.........
फोटो१५कोपरगाव