आमदार खासदारांचा निधी जलयुक्त शिवारासाठी वापरा
By Admin | Updated: December 31, 2014 19:00 IST2014-12-31T00:05:50+5:302014-12-31T19:00:59+5:30
जलयुक्त शिवार अभियानातील निधीची टंचाई दूर करण्यासाठी जिल्ातील आमदार आणि खासदारांचा निधी अभियानासाठी वळविण्याचा सूर मंगळवारी जिल्हास्तरीय कार्यशाळेतून निघाला़ त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत़

आमदार खासदारांचा निधी जलयुक्त शिवारासाठी वापरा
अहमदनगर: जलयुक्त शिवार अभियानातील निधीची टंचाई दूर करण्यासाठी जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांचा निधी अभियानासाठी वळविण्याचा सूर मंगळवारी जिल्हास्तरीय कार्यशाळेतून निघाला़ त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत़
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाला नववर्षाच्या प्रारंभीच सुरुवात होत आहे़ अभियानात सहकारी संस्था, लोकसहभाग आणि उद्योजकांनी सहभागी व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत़ या पार्श्वभूमीवर नियोजन भवन येथे सर्व शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था आणि उद्योजकांच्या प्रतिनिधींच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते़ कार्यशाळेस जिल्ह्यातील विविध सहकारी संस्था आणि कारखान्यांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली़ कार्यशाळेच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते जलयुक्त शिवार अभियानाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले़ अभियानाची उपस्थितांना महिती देण्यात आली़ त्यानंतर प्रतिनिधींना याबाबत मत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली़ काहींनी पाण्याचा अमर्याद उपसा होण्यास प्रशानसास जबाबदार धरले़ पाणी उपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी जलधोरण राबविण्याची मागणी करण्यात आली़ जलसाक्षरता अभियान राबविण्याच्याही काहींनी सूचना केल्या़ भविष्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल़ त्यादृष्टीने हे महत्वाचे पाऊल आहे़ जलयुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे, त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी़ निधीच्या मर्यादा येणार असल्याने जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांचा निधी या कामासाठी वापरण्याची मागणी यावेळी करण्यात आली़ अशोक सहकारी साखर कारखान्याचे भास्कर खंडागळे यांनी केलेल्या या सूचनेचे उपस्थितांकडून टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले़
प्रत्येक गावात किती पाऊस पडतो, त्याचे ऑडिट करण्यात यावे़ ऑडिट झाल्यानंतर त्या परिसरात कोणती पिके घ्यायची,याबाबत प्रशासनाने मार्गदर्शन करावे, त्यानुसारच पिके घेतली जातील, असे मनोगत काहींनी यावेळी व्यक्त केले़ विविध गावांसाठी पाणी योजना राबविण्यात आल्या़ परंतु त्या अद्यापही कार्यान्वितच झाल्या नाहीत, असे सांगून संभाजीराव गायकवाड यांनी जलसंधारणाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे़ जलयुक्त शिवार अभियानात तसे होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या़ एकूणच अभियानाचे स्वागत करत अभियानात सहभागी होण्याची तयारी सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींनी यावेळी दाखविली़ आ़ भाऊसाहेब कांबळे, जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील आदी यावेळी उपस्थित होते़
़़़़