लग्नाच्या शूटिंगसाठी ड्रोनचा वापर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:21 IST2021-07-28T04:21:46+5:302021-07-28T04:21:46+5:30

---------- अहमदनगर : सध्या लग्न समारंभात फोटो अथवा व्हिडिओ शूटिंगसाठी ड्रोनचा वापर करण्याकडे अधिक कल वाढत आहे. यासाठी अनेक ...

The use of drones for wedding shooting increased | लग्नाच्या शूटिंगसाठी ड्रोनचा वापर वाढला

लग्नाच्या शूटिंगसाठी ड्रोनचा वापर वाढला

----------

अहमदनगर : सध्या लग्न समारंभात फोटो अथवा व्हिडिओ शूटिंगसाठी ड्रोनचा वापर करण्याकडे अधिक कल वाढत आहे. यासाठी अनेक वेळा ड्रोन उडविताना दिसून येतात. मात्र यासाठी योग्य काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचा सल्ला दिला जात आहे. ड्रोनद्वारे शूटिंग करायचीच असेल तर प्रशिक्षित ड्रोन चालकाकडूनच करावी, असे आवाहन केले जात आहे. दरम्यान, ड्रोन उडविण्याविषयीचा परवाना न घेताच बिनधास्तपणे ड्रोनद्वारे शूटिंग केले जात असल्याचे दिसते आहे.

लग्न समारंभ म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचा क्षण असतो. हा क्षण कॅमेरात टिपणे अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यात आता ड्रोनद्वारे शूटिंग करण्यास पसंती वाढत आहे. त्यातही प्री वेडिंग शूटिंगसाठी ड्रोनचा अधिक वापर केला जातो. मात्र ड्रोनचा वापर करताना ते योग्यरीत्या उडविता आले पाहिजेत, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे दक्षता म्हणून ज्याच्याकडे प्रमाणपत्र आहे, त्यांच्याकडून शूटिंग केल्यास धोका कमी होतो, असे यातील तज्ज्ञ सांगतात. जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेतून शासकीय कामासाठी, सर्व्हेसाठी ड्रोनचा वापर केला जातो, त्यासाठी पोलीस खात्याला कळवून ही परवानगी दिली जाते, असे या गृह विभागातील सूत्रांनी सांगितले.

---------------

ड्रोन उडविण्यासाठी परवाना हवा!

१) ड्रोन उडवायचे झाल्यास त्यासाठी परवानगी, लायसन्स हवे असते. ज्या भागात ड्रोन उडवायचे आहेत, त्या भागातील पोलीस ठाण्यात अर्ज द्यावा लागतो.

२) ड्रोनचे लायसन्स हे दिल्ली येथील डीजीसीए या संस्थेकडून दिले जाते. त्यासाठी अर्ज करून हे लायसन्स मिळते.

३) जिल्ह्यात मात्र कोणतीही नियमावली नसल्याने लग्न समारंभात बिधनास्त ड्रोनचा वापर केला जात आहे.

-------------

प्रशिक्षण घेऊनच ड्रोन उडवा

ड्रोन उडविण्यासाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. स्वत:कडे किमान प्रमाणपत्र तरी हवे. प्रशिक्षण घेतलेले असल्यास यात सर्वांचीच सुरक्षितता राहू शकते. डीजीसीएचे प्रमाणपत्र हवे आणि ड्रोेनची नोंदणी झालेली असावी.

- राहुल विळदकर, ड्रोन चालक

------------------

ड्रोन वापरण्याचेही नियम

ड्रोन उडवायचे असल्यास त्यासाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

कोणत्याही भागात ड्रोन उडवायचे असल्यास यासाठी पोलिसांकडून परवानगी घेणे आवश्यक आहे.

१०० फुटांपेक्षा अधिक उंचीवरून ड्रोन उडविता येणार नाही

ज्या भागात शूटिंग करायची आहे, त्या भागातील पोलीस ठाण्यात अर्ज द्यावा लागतो.

विमानतळ, जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्वच शासकीय कार्यालय परिसरात ड्रोन उडविता येत नाही.

विनापरवानगी ड्रोन उडविल्यास कारवाई होऊ शकते. त्यामुळे एकतर परवाना अथवा प्रमाणपत्र आ‌वश्यक आहे.

--------------

एका दिवसाचे सहा ते सात हजार रुपये

ड्रोनद्वारे शूटिंग करण्यास पसंती वाढत असल्याने त्यांचे भावही काहीसे वाढत आहेत. लग्न समारंभात एका दिवसाच्या शूटिंगसाठी सहा ते सात हजार रुपये खर्च येतो. यात शहराबाहेर जायचे असल्यास खर्च वाढतो. लग्न समारंभात ड्रोनद्वारे शूटिंग करायची झाल्यास ती प्री वेडिंगच अधिक असते. त्यामुळे या दिवसासाठी अधिक रक्कम आकारली जाते, असे येथील छायाचित्रकार केतन खरपुडे यांनी सांगितले.

---------------

Web Title: The use of drones for wedding shooting increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.