गुजरातमधील उमेदवारीवरून अर्बन बँकेचे राजकारण तापले
By Admin | Updated: November 15, 2014 23:38 IST2014-11-15T23:26:53+5:302014-11-15T23:38:44+5:30
अहमदनगर : मल्टिस्टेट कायद्यानुसार सर्व जागा लढविणे पॅनलला बंधनकारक आहे. सत्ताधारी सहकार पॅनलने गुजरातमधील एका उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे,

गुजरातमधील उमेदवारीवरून अर्बन बँकेचे राजकारण तापले
अहमदनगर : मल्टिस्टेट कायद्यानुसार सर्व जागा लढविणे पॅनलला बंधनकारक आहे. सत्ताधारी सहकार पॅनलने गुजरातमधील एका उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे, तर तेथील उमेदवार मिळविण्यासाठी विरोधकांची तारांबळ उडाली आहे. याच मुद्द्याचे राजकारण करीत सत्ताधारी सहकार पॅनलने विरोधक असलेल्या जनसेवा पॅनलवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
नगर अर्बन बँक मल्टिस्टेट झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. एकूण १८ जागांपैकी एक जागा गुजरातमधून निवडून द्यावयाची आहे. या जागेसाठी सहकार पॅनलमध्ये सुरतमधील व्यापारी दिनेश कटारिया यांची उमेदवारी निश्चित केली आहे. आता विरोधकांमधून कोणता उमेदवार आहे, याची उत्सुकता लागली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांना गुजरातमध्ये उमेदवारच मिळणार नाही. मल्टिस्टेट कायद्यानुसार सर्व जागा लढविणे बंधनकारक आहे. विरोधकांना गुजरातमध्ये जागा मिळाली नाही, तर सत्ताधारी पॅनल बिनविरोध होईल, अशा बातम्या सत्ताधाऱ्यांनी पेरल्या आणि खळबळ उडवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी गटातील विद्यमान संचालकांनी मात्र सत्ताधाऱ्यांच्या या अफवा असून ते राजकारण करीत असल्याची टीका केली आहे.
अर्बन बँक ही काही राजकीय संस्था नाही. तरीही बँकेच्या निवडणुकीत राजकारण केले जात आहे. गुजरातमध्ये आम्हाला उमेदवार मिळाला आहे. त्याचे एक-दोन दिवसात नाव जाहीर करू, असे एका विरोधी संचालकाने स्पष्ट केले.
दरम्यान, शनिवारपर्यंत १७ जणांनी अर्ज दाखल केले असून आतापर्यंत ११२ अर्जांची विक्री झाली आहे. शनिवारी (दि.१५) १७ अर्जांची विक्री झाली, तर दोन जणांनी अर्ज दाखल केले आहेत. रमेश भळगट आणि रवींद्र कोठारी यांनी अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत अर्ज दाखल झालेल्यांची संख्या आता १७ इतकी झाली आहे. (प्रतिनिधी)