तोट्या नसलेले नळ... छिद्र पडलेल्या वाहिन्या

By Admin | Updated: October 29, 2014 23:57 IST2014-10-29T23:55:35+5:302014-10-29T23:57:36+5:30

अहमदनगर : तोट्या नसलेले नळ... छिद्र पडलेल्या जलवाहिन्या.... जागोजागी जलवाहिन्याखाली धुतले जाणारे कपडे.... जलवाहिन्यांना लागलेली गळती...ओव्हरफ्लो होणारे हौद... अशी दृष्ये नगरमध्ये जागोजागी दिसत आहेत.

Untreated tubes ... The pneumatic vessels | तोट्या नसलेले नळ... छिद्र पडलेल्या वाहिन्या

तोट्या नसलेले नळ... छिद्र पडलेल्या वाहिन्या

अहमदनगर : तोट्या नसलेले नळ... छिद्र पडलेल्या जलवाहिन्या.... जागोजागी जलवाहिन्याखाली धुतले जाणारे कपडे.... जलवाहिन्यांना लागलेली गळती...ओव्हरफ्लो होणारे हौद... अशी दृष्ये नगरमध्ये जागोजागी दिसत आहेत. बदलत्या हवामानामुळे कमी झालेल्या पावसामुळे एकीकडे धरणं भरण्याची चिंता असताना दुसरीकडे मात्र आहे त्या पाण्याचा अपव्यय होत आहे.
गुरुवारी (दि.३०) जागतिक काटकसर दिन आहे. पाण्याची काटकसर आता काळाची गरज बनली आहे. आगामी युद्ध पाण्यावरच होईल, अशी भाकिते तज्ज्ञांनी वर्तविली आहेत. पाण्याचा थेंब आणि थेंब वाचविण्याचा हिवरेबाजारचा प्रयोग देशाला पथदर्शी ठरला आहे. मात्र हिवरेबाजारपासून जवळच असलेल्या नगर शहरात मात्र पाण्याचा अपव्यय होतो आहे. मुळा धरणातून शहराला पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. ३५ वर्षांपूर्वीची जलवाहिनी असल्याने तिला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. या गळतीमध्येच १५ ते २० दशलक्ष लीटर पाण्याची दररोज नासाडी होत आहे. जलवाहिनीला असलेली गळती रोखण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. शहरातील पाणी वितरण व्यवस्था अत्यंत जुनी आहे. त्यामुळे पाण्याची गळती मोठ्या प्रमाणावर आहे. नगरोत्थान योजनेतील पाणी वितरण व्यवस्था सदोष आणि अपूर्ण असल्याने पाण्याची गळती रोखण्यात महापालिका प्रशासनाला अद्याप अपयशच आल्याचे ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यावरून दिसते आहे.
शहरात तोट्या नसलेल्या नळांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे लाखो लीटर पाणी रस्त्यावरून गटारीत जाते आहे. फुटक्या जलवाहिन्यांमुळे नागरिक जलवाहिनीखाली कपडे धूत आहेत. अनेक ठिकाणचे कारंजे उडत असून त्याद्वारेही पाणी वाया जात आहे. हे वाया जाणारे पाणी रोखण्याची गरज आहे.
शहरात सध्या दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे एकप्रकारे पाण्याची बचतच केली जात आहे. दिवसाआड पाणी पुरवठा होत असला तरी नळाला तोट्या नसल्याने पाणी वाया जात आहे. त्यावर आगामी काळात कारवाई केली जाईल,असे मनपाचे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता परिमल निकम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Untreated tubes ... The pneumatic vessels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.