वाहतूक शाखेत अप्रशिक्षित कर्मचारी!
By Admin | Updated: July 5, 2014 00:31 IST2014-07-04T23:22:11+5:302014-07-05T00:31:19+5:30
अहमदनगर: शहराच्या बेशिस्त वाहतुकीबाबत शहर वाहतूक शाखेला जबाबदार धरून उठसूठ कोणीही ‘उचलली जीभ लावली टाळ््याला’ असाच प्रकार सध्या सुरू आहे.
वाहतूक शाखेत अप्रशिक्षित कर्मचारी!
अहमदनगर: शहराच्या बेशिस्त वाहतुकीबाबत शहर वाहतूक शाखेला जबाबदार धरून उठसूठ कोणीही ‘उचलली जीभ लावली टाळ््याला’ असाच प्रकार सध्या सुरू आहे. शहराची हद्दवाढ झाली, लोकसंख्या वाढली, वसाहती वाढल्या, वाहने वाढली. रस्ते आहे तसेच आहेत. अतिक्रमणे वाढली. यामुळे रोजच वाहतुकीची कोंडी होते आहे. उपाययोजनांपेक्षा आंदोलने, भाषणबाजीला उधाण आले आहे. मात्र मोठ्या शहरात शहर वाहतूक शाखेचे मनुष्यबळ वाढविण्याबाबत पोलीस अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी यांच्यापैकी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही.
साडेचार लाख लोकसंखेच्या शहराला किमान दीडशे पोलीस कर्मचारी वाहतूक शाखेसाठी आवश्यक आहेत. मात्र फक्त केवळ ४० पोलिसांवरच वाहतूक शाखेचा कारभार चालतो आहे. त्यामध्ये कोणी रजेवर गेलेला असतो, तर कोणाची सुट्टी असते. त्यामुळे आहे त्या उपलब्धतेमध्येही कर्मचारी कमी पडतात. कुठे काहीही घडले तरी एकच वाहन धावते. त्यामुळे आहे त्या पोलिसांवरही ताण पडतो. अशा परिस्थितीत शहराची वाहतूक कशी काय नियंत्रित होणार, असा प्रश्न खुद्द वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांनाच पडला आहे. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार काही चौक नियंत्रित करण्यासाठी पोलिसांची रस्सीखेच लागते, तर काही रिकाम टेकड्यांना शहर वाहतूक शाखेत घुसवले जाते. ज्यांना वाहतुकीची आवड नाही,अशा पोलीस कर्मचाऱ्यांचा भरणा वाहतूक शाखेत होत आहे. त्यामुळे वाहतुकीला बेशिस्त लागली आहे. काही पोलीस कर्मचारी खास चौक मागून घेतात. त्यांच्याच आशीर्वादाने जड वाहने शहरात घुसतात,अशी चर्चा आहे. त्यामुळे आता दोष कोणाला द्यायचा,असा प्रश्न आहे.
शहर वाहतूक शाखेचा पोलीस निरीक्षक दर तीन-चार महिन्याला बदलला गेला आहे. त्यामुळे नवीन येतो तो शिस्त लावण्याचे सांगून निघून जातो. या कारणामुळे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या एकट्यावरच शहराची भिस्त आहे. त्यांच्या मदतीला आठ-दहा जणांचा ताफा असतो. अन्य कर्मचारी चौकात नियुक्तीला असतात. त्यामुळे कमी मनुष्यबळावर शहराच्या वाहतुकीचे नियंत्रण कसे करायचे, असा सवाल पोलीस निरीक्षकांनाही पडतो
आहे.
वाहतूक शाखेचा कर्मचारी देण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे धूळखात पडून आहे. यासाठी कोणताही लोकप्रतिनिधीने पुढाकार घेतलेला दिसत नाही. त्यामुळे अपघात झाले की वाहतूक शाखेवर खापर फोडून मोर्चे, आंदोलने यामध्येच नेते मंडळी पुढाकार घेताना दिसत आहेत. (प्रतिनिधी)
प्रस्ताव धूळखात
वाहतूक शाखेला किमान १५० पोलीस कर्मचारी हवे आहेत. सध्या फक्त ४० ते ६० कर्मचारीच कामावर हजर असतात. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांना नेमके कुठे नियुक्त करायचे, याचा पेच निर्माण झाला आहे. वाहतूक शाखेत पोलिसांची संख्या वाढविण्याबाबत वाहतूक शाखेकडून अनेकवेळा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आले, मात्र ते पोलीस अधीक्षक यांच्याकडेच धूळखात पडून आहेत.
स्वयंशिस्तीचे प्रशिक्षण
वाहतूक पोलिसांना आधी स्वयंशिस्त असण्याची गरज आहे. वाहतुकीचे नियम लोकांना मधुर भाषेत समजावून सांगता आले पाहिजेत. लोकांशी सौजन्याने वागले पाहिजे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई तर झालीच पाहिजे. मात्र यावेळी वाद टाळून पोलिसांनी भाषा सौम्य वापरली पाहिजे. मात्र असे कोणतेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही.