विनापरवानगी उभारले मंडप

By Admin | Updated: August 26, 2014 01:53 IST2014-08-26T00:56:52+5:302014-08-26T01:53:36+5:30

अहमदनगर: गणेश प्रतिष्ठापना अवघ्या तीन दिवसांवर आल्याने सार्वजनिक गणेश मंडळांची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. महापालिकेची कोणतीच परवानगी न घेता

Unpaved pavilion | विनापरवानगी उभारले मंडप

विनापरवानगी उभारले मंडप



अहमदनगर: गणेश प्रतिष्ठापना अवघ्या तीन दिवसांवर आल्याने सार्वजनिक गणेश मंडळांची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. महापालिकेची कोणतीच परवानगी न घेता मंडळांकडून रस्त्यावर मंडप उभारण्यात आले आहे. मंडपामुळे रस्तेही आडले गेले आहेत.
गणेशाची प्रतिष्ठापना शुक्रवारी होत आहे. गत आठवड्यापासून शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी मंडप उभारणी सुरू केली आहे. रस्त्यावर मंडप टाकताना खड्डे खोदावे लागतात. शिवाय मंडपासमोर राजकीय नेत्यांचे होर्डिंग्ज लावले जातात. त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण होते. रस्त्यावर मंडप टाकताना वाहतुकीला अडथळा निर्माण व्हायला नको याची काळजी घेणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र हा कायदाच अनेक गणेश मंडळांनी गुंडाळून ठेवला आहे. सातारा येथील एका संस्थेने खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेत खंडपीठानेच तसे आदेश दिले आहेत. त्याचाच आधार घेत परवानगी देताना अटी टाकल्या जात आहेत. गणेश मंडपासमोर फक्त मंडळाचा फलक असावा अन्य नेत्यांचे होर्डिंग्ज नको. होर्डिंग्ज लावल्या तर खंडपीठाच्या आदेशाचा अवमान समजून कारवाई केली जाईल, अशी समज मंडळांना परवानगी देतानाच दिली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी दिली.
शहरातील गणेश मंडळांनी मंडप उभारले असले तरी अजून एकाही मंडळाने महापालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केलेला नाही. त्यामुळे शहरात उभारण्यात आलेले मंडप विनापरवानगी असल्याचे स्पष्ट झाले. रस्त्यावर मंडप टाकताना रुग्णवाहिका अथवा अग्निशमन दलाची गाडी जाईल इतके अथवा ६० टक्के रस्ता खुला असावा असे बंधनकारक आहे.

अहमदनगर : शहरातील जागा महापालिकेच्या हद्दीत असल्याने मंडपाबाबत परवानगी देण्याचे अधिकार मनपाला आहेत. मात्र घेतलेल्या परवानगीपेक्षा मंडळाकडून रस्त्यावरची जास्त जागा व्यापली जात आहे, याकडे मनपाने लक्ष दिले नाही, तर संबंधित मंडळांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी मनपाला दिला आहे. रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाल्यास त्याबाबत मनपालाच जबाबदार धरणार असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.
गणेशोत्सव २९ आॅगस्टपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांच्या पातळीवरील प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या आहेत. सर्व संबंधित यंत्रणांना कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांनी पत्रं दिली आहेत. त्यामध्ये मनपाच्या आयुक्तांनाही पत्र पाठवून रस्त्यावर अतिक्रमण केल्यास मंडळावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी मंडळांकडून मंडप टाकण्याचे काम सुरू आहे. यापूर्वीच्या अनुभवाप्रमाणे मंडळाचे कार्यकर्ते महापालिकेने दिलेल्या जागेच्या परवानगीपेक्षा मोठ्या आकाराचा मंडप रस्त्यावर टाकतात. त्यामुळे वाहनांची कोंडी होते. यावेळी मंडप टाकतेवेळी संबंधित मंडळांवर महापालिकेचे कोणतेही नियंत्रण नसते. यंदाच्या गणेशोत्सवात मंडळांना परवानगी देताना मंडळांवर मनपाने बंधने घालावीत, अशा सूचनाच पोलिसांनी दिल्या आहेत.
अहमदनगर : गणेशोत्सवादरम्यान सर्व तरूण मंडळांनी तात्पुरत्या स्वरूपात रितसर वीजजोड घ्यावा. त्याची प्रक्रिया सुलभ असून धार्मिक कार्यासाठी महावितरण स्वस्तात वीज उपलब्ध करून देते. त्यामुळे कोणीही वीजचोरी करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
धार्मिक कार्यक्रमांसाठी महावितरण घरगुती दरांपेक्षाही कमी दरात वीज उपलब्ध करून देते. त्यासाठी गणेश मंडळांनी रितसर अर्ज करून विजेची मागणी करावी. तात्पुरत्या स्वरूपात दिली जाणारी ही वीजजोड प्रक्रिया सुलभ व सोपी आहे. अर्ज केल्यानंतर महावितरणकडून मीटरसहीत पूर्णपणे सुरक्षित वीजजोडणी मंडळांना दिली जाते. त्यासाठी प्रतियुनिट ३.२० पैसे इतका माफक वीजदर आहे. आपापल्या विभागातील वीजकेंद्रात अर्ज दाखल करून ही परवानगी घ्यावी. कोणीही आकडा टाकून किंवा घरगुती वापराची वीज घेऊ नये. गणेशोत्सव काळात होणारी गर्दी व भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता रिसतर वीजजोड फायदेशीर ठरणार आहे. शहरातील सर्वच मंडळांनी आतापर्यंत महावितरणकडून वीजजोडसाठी परवानगी घेतलेली आहे. परंतु एखाद्या मंडळात वीजचोरी आढळली तर कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Unpaved pavilion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.