विद्यापीठ उपकेंद्राला तोतयाची ‘बाधा’
By Admin | Updated: June 21, 2014 00:47 IST2014-06-20T23:38:49+5:302014-06-21T00:47:43+5:30
अहमदनगर : पुणे विद्यापीठाच्या नगर येथील उपकेंद्राला तोतयागिरीची ‘बाधा’ झाली आहे. ही बाधा दूर करण्यासाठी विद्यापीठाकडे एकही तज्ज्ञ ‘डॉक्टर’ नसल्याने ती आणखीच वाढते आहे.
विद्यापीठ उपकेंद्राला तोतयाची ‘बाधा’
अहमदनगर : पुणे विद्यापीठाच्या नगर येथील उपकेंद्राला तोतयागिरीची ‘बाधा’ झाली आहे. ही बाधा दूर करण्यासाठी विद्यापीठाकडे एकही तज्ज्ञ ‘डॉक्टर’ नसल्याने ती आणखीच वाढते आहे. विद्यापीठाच्या नावाने बनावट आॅर्डर काढून एक तोतया तरूणांची फसवणूक करीत आहे. यापूर्वीही अशी घटना घडली आहे. मात्र, याबाबत ठोस पावले उचलली जात नसल्याने विद्यापीठाचीच बदनामी होत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून चार तरूणांनी येथील विद्यापीठ उपकेंद्रात हजर करून घेण्यासाठी धोशा लावला आहे. वास्तविक विद्यापीठाने कोणतीही आॅर्डर काढली नाही. हजर करून घेण्यासाठी तेथील प्रशासनावर ते दबाव आणीत आहेत. याबाबत सिनेट सदस्य शिवाजी साबळे व केंद्र संचालक डॉ. अशोक जाधव यांनी खमकी भूमिका घेतल्यावर त्या सर्वांनीच काढता पाय घेतला.
‘आम्हाला विद्यापीठाने सहायक म्हणून आॅर्डर दिली आहे. तुम्ही आम्हाला हजर करून घ्या. तुमच्या मेलवर त्याची आॅर्डर आली आहे,’ हे चार युवक सांगतात. अशा प्रकारची आॅर्डर आलेली नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यांनी तेथेच ठिय्या मांडला. त्यांची नावे उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी विचारली असता रवींद्र सखाराम देवरे (नेहरूनगर, ता.साक्री,धुळे), दीपक पितांबर पाठक (भिंगार), बाबूराव उत्तम खेडकर (तीनखडी, पाथर्डी), मारूती शहादेव बोडखे (वाळुंज पारगाव,नगर) अशी नावे सांगितली. सोबत त्यांनी मोबाईल क्रमांकही दिले आहेत. ‘लोकमत’ने त्या क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, उडवीउडवीची उत्तरे मिळाली. त्यामुळे ही नावे व क्रमांकही दुसऱ्याच व्यक्तीचा दिला असण्याची शक्यता आहे. त्यांच्या समवेत आणखी एक मनुष्य होता. तो या सर्वांना ‘मार्ग’दर्शन करीत होता. (प्रतिनिधी)
विद्यापीठ उपकेंद्रात काही जागा कंत्राटी पद्धतीने (सहा महिने)भरल्या जातात. याचा फायदा घेत नोकरी लावून देण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील एक तोतया विद्यापीठाचा अधिकारी असल्याचे सांगून पैसे उकळतो. यापूर्वी त्याने पाईपलाईन रस्त्यावर कार्यालय थाटून उद्योग केला होता. मात्र, पोलीस कारवाई होण्याची कुणकुण लागताच त्याने गाशा गुंडाळला. त्याचा हा उद्योग राज्यभर सुरू आहे. तोच अधूनमधून अशा बनावट आॅर्डर काढीत असतो.
नगरमधील महाविद्यालय सामील?
नगरमधील एका नामांकित महाविद्यालयाचा या प्रकरणात समावेश असण्याची शक्यता आहे. नोकरीची ती आॅर्डर घेऊन येणारे तरूण विद्यापीठाने आमची लेखी परीक्षा त्या महाविद्यालयात घेतल्याचे सांगतात. त्यामुळे त्या महाविद्यालयातील प्राध्यापक, शिपाई या प्रकरणात सामील असण्याची शक्यता आहे.
सुविधा केंद्र असुविधेच्या फेऱ्यात
कुलगुरू वासुदेव गाडे यांच्या हस्ते विद्यार्थी केंद्राचे उद््घाटन झाले आहे. मात्र, ते विद्यार्थ्यांच्या सेवेत दाखल होण्याऐवजी असुविधेच्या फेऱ्यात सापडले आहे. त्यासाठी अद्यापि कर्मचारीही नेमले नाहीत. विद्यापीठाने त्यासाठी लागणारी लॅनही जोडलेली नाही. त्यामुळे ते सुरू होऊ शकले नाही. प्रवेशाच्या काळात हे केंद्र सुरू नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण होत आहे.
चार विद्यार्थी आॅर्डर घेऊन आले होते. मात्र, त्यांनी ती उपकेंद्रात दिली नाही. तुमच्या नेटवर आॅर्डर पडलीय, आम्हाला विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागातून सांगितलय, असे ते सांगत होते. परंतु विद्यापीठाने अशी कोणतीही आॅर्डर काढली नाही. हा सर्व प्रकार गोलमाल असल्याचे दिसते. त्याबाबत विद्यापीठाला कळविले आहे.
—डॉ. अशोक जाधव, केंद्र संचालक, पुणे विद्यापीठ.