कोपरगाव : श्रीक्षेत्र काशी येथील गंगा हिंदू धर्मातील एक पवित्र नदी मानली जाते. वेद आणि पुराणांमध्येसुद्धा गंगेचा उल्लेख पाहायला मिळतो. आजही ऋषी-मुनींचे आश्रम या नदीकिनारी पाहायला मिळतात. त्यामुळे याच नदीचे पाणी अर्थात गंगाजल यास नकारात्मक ऊर्जा नाहीशी करण्याबरोबरच हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे ह.भ.प. योगेश महाराज करंजीकर यांनी म्हटले आहे.
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील ह.भ.प. मच्छिंद्र महाराज टेके यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी १९ दिवसांचा १,४०० किलोमीटर सायकलचा प्रवास करून काशी येथून आणलेल्या गंगाजलाने शनिवारी (दि. १४) सकाळी ९ वाजता वारी येथील श्री रामेश्वर महादेव मंदिरात अभिषेक केला. त्या निमित्ताने वारी ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत करून महाप्रसाद तसेच प्रवचनाचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. त्याप्रसंगी करंजीकर महाराज बोलत होते.
करंजीकर महाराज म्हणाले, मच्छिंद्र महाराजांचा वयाच्या ६५ वर्षी स्वतःवर असलेला आत्मविश्वास, चिकाटी, जिद्द व भगवंतांवर असलेली अपार श्रद्धा, यामुळेच २७ जुलैला काशी येथून सायकलवरून दररोज सरासरी ९० ते १०० किलोमीटरचा प्रवास करीत १९ व्या दिवशी आपल्या गावात येऊन महादेव अभिषेक केला.
यावेळी विकास महाराज यादव, अतुल महाराज शिंदे, गणेश महाराज गोंडे, विनायक महाराज टेके, सुरेखाताई टेके महाराज, माजी सभापती मछिंद्र टेके, सेवानिवृत्त न्यायाधीश विनायकराव लोंढे, नामदेव जाधव, नवनाथ जाधव, सुरेश निकम, गोरख टेके, रावसाहेब जगताप, रामकृष्ण पटारे, अशोक टेके, श्रीकांत टेके, फकीर टेके, राजेंद्र टेके, कैलास गोंडे, संजय थोरात यांच्यासह ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.
..........
सहा वर्षांपूर्वी श्रीक्षेत्र काशी येथील गंगाजल पायी चालत येत गावातील गोदावरी नदीत सोडले होते. तेव्हापासून एकदा तरी सायकलवरून पुन्हा काशी ते वारी अशी यात्रा करण्याचा मानस होता. ते आता प्रत्यक्षात पूर्ण झाल्याने आत्मिक समाधान वाटत आहे.
- ह.भ.प. मच्छिंद्र महाराज टेके
.........
फोटो१४ - मछिंद्र टेके स्वागत - कोपरगाव