शिवसेनेत अंतर्गत धुसफुस!

By Admin | Updated: May 24, 2014 00:39 IST2014-05-23T23:52:22+5:302014-05-24T00:39:35+5:30

अहमदनगर : एकीकडे शिवसेनेत ‘अच्छे दिन आने वाले है’ अशी परिस्थिती असताना पक्षात अंतर्गत धुसफुस सुरु झाली आहे.

Under the Shivsena Smile! | शिवसेनेत अंतर्गत धुसफुस!

शिवसेनेत अंतर्गत धुसफुस!

अहमदनगर : एकीकडे शिवसेनेत ‘अच्छे दिन आने वाले है’ अशी परिस्थिती असताना पक्षात अंतर्गत धुसफुस सुरु झाली आहे. शिवसेनेचे उपनेते आ. अनिल राठोड व जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्यातील मतभेदामुळे सेनेत गटबाजीच्या राजकारणाचा प्रवेश होऊ घातला आहे. काँग्रेस, राष्टÑवादी, भाजप व मनसे या पक्षांप्रमाणे कधीकाळी ‘एकीची वज्रमूठ’ असणारी शिवसेना ‘शहरी’ व ‘ग्रामीण’ अशा स्वरुपात विभागली जात आहे. जिल्हाप्रमुख प्रा. गाडे यांचा शहरातून लढण्याचा इरादा त्याचाच परिपाक असल्याचे बोलले जात आहे. सव्वा दोन वर्षांपुर्वी झालेल्या जि. प. निवडणुकींपासून सेनेतील गटबाजी उफाळुन आली आहे. प्रा. गाडे यांनी मागील विधानसभा लढवण्यासाठी राहुरी मतदारसंघाची निवड केली होती. मात्र मागील वेळी हा मतदारसंघ भाजपकडे गेला. आ. शिवाजी कर्डिले व प्रा. गाडे यांचा नगर तालुक्यात राजकीय संघर्ष असूनही प्रा. गाडे यांनी युतीचा धर्म पाळत कर्डिलेंसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. गाडे यांचा कर्डिलेंशी वाढता ‘स्रेह’च आ. राठोड व प्रा. गाडे यांच्यातील दुराव्याला कारणीभूत ठरला. यानंतर शहर शिवसेना आयोजित कार्यक्रम आंदोलन, बैठका यातून प्रा. गाडेंना जाणीवपूर्वक वगळले जाऊ लागले. प्रा. गाडे यांचे ‘मातोश्री’वरील वाढते कनेक्शनही याला कारणीभूत ठरत गेले. ज्येष्ठ माजी नगरसेवक अंबादास पंधाडे यांची पाठराखण करण्यावरुन या दोन नेत्यांमध्ये दुरावा वाढला. प्रा. गाडे यांनी पंधाडे यांची पाठराखण केल्याने आ. राठोड नाराज झाले. संबंध ताणतच गेले. प्रा. गाडे यांनी दक्षिणेत सेनेची ताकद वाढवून जि. प. निवडणुकांसाठी सेनेचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला. यावेळी बुºहाणनगर गटाचा आ. राठोड यांनी दावा करुन प्रा. गाडे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. हा गट आ. कर्डिले यांचा बालेकिल्ला होता. यामुळे कर्डिले-शिवसेना संबंध बिघडून युती तोडण्याचाही प्रयत्न झाला. भाजपची अधिकृत उमेदवारी असतानाही आ. राठोड यांनी सेनेचा अधिकृत उमेदवार त्या गटात देऊन मैत्रीपूर्ण लढत लढवली. यामुळे उपनेते व जिल्हाप्रमुख अशी गटबाजी सुरू झाली. शहरात शिवसेनेवर आ. राठोड यांची पकड व ग्रामीण सेनेवर प्रा. गाडे यांचा प्रभाव यामुळे सेनेची वज्रमूठ विभागली. आंदोलन, मोर्चा, बैठकाही शहराच्या स्वतंत्र व दक्षिण जिल्ह्याच्या स्वतंत्र यामुळे संघर्षाची पणती तेवतच राहिली. शिर्डीची जबाबदारी प्रा. गाडे यांना मिळाल्याने ही धुसफुस आतल्या आत वाढत गेली. आता विधानसभा निवडणुका अवघ्या सहा महिन्यांच्या अवधीवर आल्या असताना आणि सेनेला प्रथमच ‘अच्छे दिन’ आलेले असताना हा दुरावा कमी होण्याऐवजी वाढतच आहे. (प्रतिनिधी) गाडे शहर सेनेतून ‘गायब’ प्रा. गाडे यांना पक्षांतर्गत शह देण्यासाठी शहरात लावण्यात येणार्‍या ‘शहर शिवसेनेच्या’ फ्लेक्सवरुन प्रा. गाडे यांचे नाव कधी ‘गायब’ करण्यात आले ते त्यांना समजलेच नाही. सेनेच्या फलकावरुन जिल्हाप्रमुखच गायब होत राहिल्यानेही अंतर्गत खदखद वाढतच गेली. जिल्हा सेनेतून राठोड ‘गायब’ मग आ. राठोड यांचा कित्ता गिरवत सध्या जिल्हा शिवसेनेच्या वतीने लावण्यात आलेले फ्लेक्स, फलक, बैठका यामधून आ. राठोड यांचे ही नाव वगळले जाऊ लागले. नव्या खासदारांच्या अभिनंदनाच्या जाहिराती फलकावर तर राठोड सोडून सर्वांचीच छायाचित्रे आहेत. हाच दुराव्याचा भक्कम पुरावा मानला जात आहे. गाडेंना शहरातून गायब केल्याने राठोड यांचे नाव जिल्हा सेनेतून गायब झाले आहे. उमेदवारीवरुन रणकंदन प्रा. गाडे यांना यावेळी आमदार करायचेच अशी खुणगाठ बांधलेल्या शिवसैनिकांनी त्यांना ‘श्रीगोंद्या’चा पर्याय समोर ठेवला. मात्र तेथे सध्या तरी भाजपची जागा आहे. जागा बदलली गेली तरच गाडेंना तेथे उमेदवारी मिळेल. राठोड यांचे सेनेतील अंतर्गत विरोधक व भाजपाचे पदाधिकारी गाडे यांना शहरातून ‘तयारी’ करण्याचा सल्ला देत आहेत. गाडे यांनीही तशी तयारी असल्याचे सांगितले. यामुळे शहराच्या सेनेच्या उमेदवारीवरुन रणकंदन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Under the Shivsena Smile!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.