प्रशासकीय बदल्यांवरून कर्मचार्यांत वाढली अस्वस्थता
By Admin | Updated: May 11, 2014 00:54 IST2014-05-11T00:48:38+5:302014-05-11T00:54:39+5:30
अहमदनगर : जिल्हा परिषद लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कर्मचार्यांच्या बदल्यांची पक्रिया सुरू होणार आहे.

प्रशासकीय बदल्यांवरून कर्मचार्यांत वाढली अस्वस्थता
अहमदनगर : जिल्हा परिषद लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कर्मचार्यांच्या बदल्यांची पक्रिया सुरू होणार आहे. मात्र, प्रशासकीय बदल्यांवरून कर्मचार्यांत गोंधळाची स्थिती असून विशेष करून प्राथमिक शिक्षकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. बदल्यांपूर्वी मुख्याध्यापक, उपशिक्षक यांच्या पदोन्नत्या आणि समायोजन केल्यास त्याचा फायदा शिक्षकांना होईल अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे. दरवर्षी जिल्हा परिषदेच्या ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील कर्मचार्यांची ५ टक्के प्रशासकीय आणि १० टक्के बदल्या होत असतात. गेल्या वर्षी प्रशासकीय बदल्यां सोबत आपसी बदल्या झाल्या. मात्र, ऐनवेळी काही जिल्हा परिषद सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतल्याने त्यांना स्थगिती देण्यात आली. यंदा लोकसभा निवडणुका झालेल्या असून काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामुळे प्रशासकीय बदल्यांमध्ये सुट मिळेल, अशी अपेक्षा कर्मचार्यांमध्ये आहे. जिल्हा परिषदेत आरोग्य, शिक्षण आणि ग्रामपंचायत हे सर्वात मोठे संवर्ग आहेत. यातही प्राथमिक शिक्षकांची संख्या मोठी असल्याने त्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पाडण्याचे दिव्य प्रशासना समोर आहे. १५ दिवसांपासून जिल्हा परिषद प्रशासाने बदल्यांची प्रक्रिया सुरू केली आहे. यात बदली पात्र कर्मचार्यांची सेवा ज्येष्ठता यादी, विनंती बदली शिक्षकांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. दरम्यान, शिक्षकांच्या बदल्या करण्यापूर्वी मुख्याध्यापक आणि उपशिक्षकांची पदोन्नती करणे आवश्यक आहे. बालकांच्या मोफत शिक्षणाच्या कायद्यानूसार जिल्ह्यात सुमारे ६०० शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. पूर्वी पहिली ते सातवीपर्यंत कितीही पट (विद्यार्थी संख्या) असली तरी मुख्याध्यापकांच्या पदाला मान्यता होती. मात्र, आता नवीन कायद्यानूसार १ ते १५० पटसंख्येपर्यंत मुख्याध्यापक पदाला मान्यता आहे. यामुळे ३०० मुख्याध्यापक आणि ३०० उपशिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. यामुळे या मुख्याध्यापकांचे समायोजन आणि पदोन्नती आधी होणे आवश्यक आहे. त्यानंतर बदल्यांची प्रक्रिया राबविल्यास शिक्षकांची सोय होणार आहे. १५ दिवसांपूर्वी जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी मुंबईत ग्रामविकास मंत्री यांची भेट घेवून प्रशासकीय बदल्या रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावर सकारात्मक चर्चा झाली असल्याचे सांगण्यात आहे. मात्र, प्रत्यक्षात असा कोणताच निर्णय निघालेला नाही. यामुळे शिक्षकांसह सर्वांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. (प्रतिनिधी) सोमवारी बैठक शिक्षकांच्या बदल्या, त्यांच्या अडचणी सोडविण्याबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी १२ तारखेला मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांची बैठक बोलावली आहे. यात बदल्या, समायोजन आणि पदोन्नतीबाबत चर्चा होणार आहे. प्रशासनाने शासनाच्या धोरणानूसार शिक्षकांच्या बदल्या कराव्यात. मात्र, त्या करत असताना शिक्षकांची सोय पाहावी. गेल्यावर्षी पेसा कायद्याचा फटका अनेकांना बसला आहे. यामुळे आधी पदोन्नती, मग समायोजन आणि त्यानंतर बदल्या कराव्यात. यात प्रशासनाचा ताण कमी होणार आहे. -रावसाहेब रोहकले, शिक्षक नेते.