‘सीईओं’विरुद्ध अविश्वासाच्या हालचाली

By Admin | Updated: June 2, 2016 23:10 IST2016-06-02T23:05:25+5:302016-06-02T23:10:38+5:30

अहमदनगर : प्राथमिक शिक्षकांच्या समानीकरणाच्या बदल्या अन्यायकारक पद्धतीने झाल्या आहेत.

Unbelief move against 'CEOs' | ‘सीईओं’विरुद्ध अविश्वासाच्या हालचाली

‘सीईओं’विरुद्ध अविश्वासाच्या हालचाली

अहमदनगर : प्राथमिक शिक्षकांच्या समानीकरणाच्या बदल्या अन्यायकारक पद्धतीने झाल्या आहेत. प्रशासनाने जाणीवपूर्वक पदोन्नतीच्या अगोदर या बदल्या केल्या असा आरोप करत जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांनी गुरुवारी सभात्याग केला. त्यामुळे सर्वसाधारण सभेचे कामकाज होऊ शकले नाही. दरम्यान, अवघ्या एक महिन्यापूर्वी आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्यावर अविश्वास आणण्यासाठी विशेष सभा बोलविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासाठी रात्री सदस्यांच्या सह्यांची मोहीम राबविण्यात आली.
जि.प. अध्यक्षा मंजुषा गुंड यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी सर्वसाधारण सभा झाली. सभेला सुरुवात होताच सुजित झावरे यांनी शिक्षकांच्या बदल्यांचा विषय मांडला. दोन वर्षापूर्वी सर्वसाधारण सभेने आंतरजिल्हा बदली शिक्षकांना जिल्ह्यात सामावून घेण्याचा निर्णय घेतलेला असतांना त्यावर अंमलबजावणी का झाली नाही? आॅनलाईन बदल्यांत पदाधिकारी व सदस्यांनी सुचवलेल्या किती कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या? आॅनलाईन बदल्यात त्रुटी आहेत का? सदस्यांनी सुचवलेल्या कामांवर अधिकारी नियम दाखवतात. मात्र, ते अधिकारी त्यांची कामे करतांना नियम पायदळी तुडवतात, असा आरोप करत आमचे अधिकार काय? हे अगोदर सांगा असा प्रश्न त्यांनी केला.
अधिकारी आपले ऐकत नाही, असे वक्तव्य उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी केल्याचे आम्ही वर्तमानपत्रात वाचले. याबाबतची वस्तुस्थिती सभागृहासमोर मांडावी, असा मुद्दा उपस्थित करत राजेंद्र फाळके यांनीही प्रशासनावर निशाणा साधला. याच विषयावर अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी चर्चेत उडी घेत नियमावर बोट ठेवून सर्व कामे होत नाहीत. काही कामे नियमात बसवावी लागतात, असे सांगितले.
हर्षदा काकडे यांनी प्रशासन हे पती-पत्नी यांचे एकत्रिकरण करण्याऐवजी त्यांना विभक्त करत असल्याचा आरोप केला. या विषयावर पाटील, झावरे व अध्यक्षा गुंड यासुद्धा आक्रमक बनल्या. बाळासाहेब हराळ यांनी समानीकरणाचा अर्थ मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगावा अशी मागणी करत भितीपोटी ७६ पद्वीधर शिक्षकांनी पदावनतीसाठी अर्ज केला असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणले. आधी शिक्षकांची पदोन्नती आणि त्यानंतर समानीकरण झाले असते, तर आमचा विरोध नव्हता, कर्मचाऱ्यांचे हित जोपासले जाणे आवश्यक आहे. प्रशासनाने काहीही केले तर सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी ते खपवून घ्यायचे का? आदी प्रश्नांचा भडिमार यावेळी करण्यात आला.
सदस्यांच्या मागणीनंतरही बिनवडे बदल्यांवर ठाम असल्याने सदस्यांनी सभात्यागाचा पवित्रा घेतला. तीन तास याच विषयावर खल सुरु होता. सभेनंतर सदस्यांनी ‘सीेईओं’वर अविश्वास आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत.
(प्रतिनिधी)

Web Title: Unbelief move against 'CEOs'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.