अन ‘त्यांना’ मिळाली पारनेरकरांच्या मायेची ऊब
By Admin | Updated: November 15, 2014 23:37 IST2014-11-15T23:25:57+5:302014-11-15T23:37:45+5:30
पारनेर : पावसामुळे होणारे हाल पाहून त्यांची निवाऱ्याची स्वत:च्या घरी, सभागृह व इतर ठिकाणी व्यवस्था केल्याने त्यांनाही पारनेरकरांच्या मायेची उव मिळाली.

अन ‘त्यांना’ मिळाली पारनेरकरांच्या मायेची ऊब
पारनेर : ‘इस्तेमा’ या धार्मिक कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून आलेल्यांचे पावसामुळे होणारे हाल पाहून त्यांची निवाऱ्याची स्वत:च्या घरी, सभागृह व इतर ठिकाणी व्यवस्था केल्याने त्यांनाही पारनेरकरांच्या मायेची उव मिळाली. यानिमित्ताने मुस्लिमांना हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन घडले.
पारनेर येथे पानोली रस्त्यावरील डॉ. सादीक राजे विद्यालयाजवळील मोकळ्या जागेत विस्तीर्ण मंडपात ‘इस्तेमा’ या दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमाचे शुक्रवारी रात्रीपासून आयोजन केले आहे.
कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून मुस्लीम बांधव पारनेर येथे मोठ्या संख्येने दाखल झाले. परंतु शुक्रवारी रात्रभर व शनिवारी दुपारपर्यंत पावसाची संततधार सुरूच असल्याने मंडपातील सर्व जागा, तंबू पाण्याने भरले होते. त्यामुळे बसण्यासही जागा नव्हती.
आनंद फौडेशनचे प्रमुख डॉ. आर.जी.सय्यद, डॉ.सादीक राजे, खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष हसन राजे, डॉ.बिलाल सय्यद, डॉ.मुदस्सीर सय्यद, मुजाहिद सय्यद, राजू शेख, आयाज तांबोळी, नजीर तांबोळी यांनी जागेसाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. परंतु पारनेर येथे शंकर नगरे, विजय औटी, प्रा.सचिन गाडगे, दिलीप ठुबे, दिनेश थोरात यांच्यासह अनेकांनी व पानोली येथील काही कुटुंबांनी आपली घरे, सभागृह, मंगल कार्यालये उपलब्ध करून दिली. यामुळे शनिवारी आलेल्या मुस्लीम बांधवांची निवासाची व्यवस्था झाली. यातून पारनेरकरांच्या एकीचे दर्शन त्यांना घडल्याचे डॉ.आर.जी.सय्यद यांनी सांगितले.
पारनेर शहरासह तालुक्यात नेहमीच हिंंदुंच्या कार्यक्रमात डॉ.आर.जी.सय्यद व त्यांचे कुटुंब, हसन राजे व इतरांचे योगदान असते. पारनेर येथील अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये असलेला त्यांचा सहभाग ऐक्य घडविणारे असल्याचे प्रा.सचिन गाडगे यांनी सांगितले.
रविवारी दिवसभर हा धार्मिक कार्यक्रम चालणार आहे. यासाठी जिल्ह्यातून मार्गदर्शक आले आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
(तालुका प्रतिनिधी)