उमेश पोटे यांचे बाजार समिती संचालकपद रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST2021-06-09T04:25:29+5:302021-06-09T04:25:29+5:30
श्रीगोंदा : बाजार समिती कायद्याचे उल्लंघन, कोरोनाचे कारण सांगून लिंबू लिलाव रद्द करून शेतकऱ्यांची लूट, संचालकपदाचा गैरवापर करून बाजार ...

उमेश पोटे यांचे बाजार समिती संचालकपद रद्द
श्रीगोंदा : बाजार समिती कायद्याचे उल्लंघन, कोरोनाचे कारण सांगून लिंबू लिलाव रद्द करून शेतकऱ्यांची लूट, संचालकपदाचा गैरवापर करून बाजार समितीचे गाळेभाडे न भरणे आदींबाबत ठपका ठेवून उमेश पोटे यांचे बाजार समितीचे संचालकपद जिल्हा उप निबंधक दिग्विजय आहेर यांनी रद्द केले आहे. याबाबत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी तक्रार केली होती.
उमेश पोटे यांनी व इतर लिंबू व्यापाऱ्यांनी बाजार समितीमध्ये लिलाव न करता मागील दोन वर्षांपासून बेकायदा लिंबू खरेदी केली. त्यातून बाजार समितीचे नुकसान केले. त्यांनी इतर व्यापाऱ्यांना हाताशी धरून संप सुरू केला. बाजार समिती कायद्याचे उल्लंघन करून शेतकऱ्यांची लूट केली, आदी तक्रारी भोस यांनी केल्या होत्या. त्यानुसार सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांनी बाजार समितीची दप्तर तपासणी केली व जिल्हा उपनिबंधक यांना अहवाल सादर केला होता.
उमेश पोटे यांनी बाजार समितीचे कायद्यातील नियम १२ ते २० चे पालन केलेले नाही. तसेच वेळोवेळी केलेल्या व्यवहारावरील महसूल बुडविलेला आहे. कोरोनाचे कारण पुढे करून पोटे यांनी लिलाव बंद करून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केले. त्यांनी बाजार समितीकडून घेतलेल्या गाळ्याचे भाडे संचालकपदाचा गैरवापर करून वेळेवर भरलेले नाही. संचालकपदाचा वापर करून चुकीचे रेकॉर्ड तयार करून मार्केट फी व सुपरव्हिजन फी बुडविली. बाजार समिती आवाराबाहेर काटा लावून लिंबू खरेदी केले. इतर ठिकाणी खरेदी केलेले लिंबू बाजार समितीच्या गाळ्यावर आणून पॅकिंग करून इतर ठिकाणी पाठविले. त्याची कुठलेही नोंद बाजार समितीस दिली नाही. बाजार समितीच्या कोणत्याही आदेशाचे पालन केले नाही, असा ठपका त्या अहवालात पोटे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी पोटे यांचे संचालकपद रद्द केले.