उमेदच्या कर्मचाऱ्यांनी घेतली अण्णा हजारे यांनी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:35 IST2020-12-13T04:35:56+5:302020-12-13T04:35:56+5:30
अहमदनगर : राज्य शासनाच्या ‘उमेद’ योजनेतील कर्मचारी हिवाळी अधिवेशनाच्या काळात विविध मागण्यांसाठी मुंबईला धरणे आंदोलन करणार आहेत. या कर्मचाऱ्यांच्या ...

उमेदच्या कर्मचाऱ्यांनी घेतली अण्णा हजारे यांनी भेट
अहमदनगर : राज्य शासनाच्या ‘उमेद’ योजनेतील कर्मचारी हिवाळी अधिवेशनाच्या काळात विविध मागण्यांसाठी मुंबईला धरणे आंदोलन करणार आहेत. या कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धीत भेट घेतली. यावेळी उमेदच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळविणार असल्याचे आश्वासन हजारे यांनी शिष्टमंडळाला दिले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती आणि बाह्य संस्थेमार्फत भरती करण्याचा घाट सरकारने घातला आहे. याविरोधात आता राज्यभरातील कर्मचारी कल्याणकारी मंडळाच्या झेंड्याखाली एकत्र आले आहेत. १४ ते १७ डिसेंबर या कालावधीत हिवाळी अधिवेशनादरम्यान मुंबईच्या आझाद मैदानावर दहा हजार कर्मचारी कुटुंबीयांसह आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाबाबत उमेदचे कर्मचारी कल्याण मंडळाचे सचिव डॉ. बलभीम मुंडे, उपाध्यक्ष प्रमोद चिंचोरे, मंजूषा धीवर,आजिनाथ आव्हाड, रवींद्र खलाटे, महादेव शिंदे आदींनी अण्णांची भेट घेतली.
यावेळी अण्णा हजारे म्हणाले, उमेदच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत लवकरच आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहेत. आपला उमेदच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या आंदोलनाच्या तयारीसंदर्भात नियोजनासाठी राज्यस्तरीय बैठक नगरला झाली. यावेळी राज्यातील जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.
--
फोटो- १२ उमेद
उमेद कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धीत भेट घेतली.