उक्कलगाव : महसूल प्रशासनाने प्रवरा नदीपात्रातील वाळू लिलाव घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यास तालुक्यातील उक्कलगाव येथील ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे.
गुरुवारी त्यासाठी ग्रामसभा घेण्यात आली होती. त्यास उपसरपंच सुरेखा थोरात, माजी सभापती आबासाहेब थोरात, पोलीस पाटील हिराबाई कराळे, ज्ञानेश्वर थोरात, अनिल थोरात, विकास थोरात, बबन रजपूत, सर्कल सी. बी. बोरूडे, तलाठी आय. आय. इमानदार, रमेश निबे, नंदू बोंबले उपस्थित होते.
गेल्या दहा वर्षांपासून सरकारी धोरणानुसार ग्रामपंचायतीला गौण खनिजातून ५० ते ७० लाख रुपयांचा महसूल मिळणे अपेक्षित होते; मात्र अद्याप ते पैसे मिळालेले नाहीत. तोपर्यंत वाळूचा लिलाव करण्यास आपला विरोध असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. महसूल विभागाकडून ग्रामपंचायतीला पैसे मिळाले तरीही बंधाऱ्यामधील पाणी न सोडता वाळू उचलावी, अशी अट यावेळी ग्रामस्थांनी घातली. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. या सभेला महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.