जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी उदय शेळके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:19 IST2021-03-07T04:19:12+5:302021-03-07T04:19:12+5:30
अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे उदय शेळके, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे माधवराव कानवडे यांची बिनविरोध निवड झाली. ...

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी उदय शेळके
अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे उदय शेळके, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे माधवराव कानवडे यांची बिनविरोध निवड झाली. या दोघांची नावे अंतिम झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ ने शनिवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्यावरच संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले.
निवड प्रक्रिया पार पडण्यापूर्वी पदाधिकारी निवडीबाबत चर्चा करण्यासाठी शनिवारी सकाळी ११ वाजता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्या लाल टाकी येथील शासकीय बंगल्यावर नव्या संचालकांसमवेत बैठक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री थोरात यांची चर्चा झाल्यानंतर अध्यक्षपद राष्ट्रवादीला व उपाध्यक्षपद काँग्रेसकडे घेण्याचे ठरले. त्यानंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. दुपारी १ वाजता बँकेच्या मारुतराव घुले पाटील सभागृहात निवडीची बैठक झाली. जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. अध्यक्षपदासाठी शेळके व उपाध्यक्षपदासाठी कानवडे या दोघांचेच अर्ज आल्याने त्यांचीच बिनविरोध निवड झाली. उदय शेळके पारनेरमधून राष्ट्रवादीचे संचालक असून २०१२ - २०१५ असे तीन वर्षे त्यांनी बँकेचे उपाध्यक्षपद सांभाळले आहे. तर कानवडे पहिल्यांदाच काँगेसकडून संचालक झाले असून ते थोरात समर्थक आहेत.
बैठकीला नूतन संचालक मंत्री शंकरराव गडाख, आमदार मोनिका राजळे, आमदार आशुतोष काळे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, माधवराव कानवडे, राहुल जगताप, अमोल राळेभात, प्रशांत गायकवाड, आशा तापकीर, अशोक भांगरे, अनुराधा नागवडे, गणपत सांगळे, विवेक कोल्हे, सीताराम गायकर, अंबादास पिसाळ, अण्णासाहेब म्हस्के, अरुण तनपुरे, चंद्रशेखर घुले, करण ससाणे उपस्थित होते.
----------
थोरातांच्या बैठकीला कर्डिलेंची हजेरी
राष्ट्रवादी व काँग्रेसच्या संचालकांची बैठक थोरात यांच्या अध्यक्षतेखाली लाल टाकी येथे झाली. या बैठकीला भाजपचे संचालक शिवाजी कर्डिले, विवेक कोल्हे उपस्थित होते. कर्डिले यांनी काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील प्रस्थापित व कारखानदारांवर आरोप करत ते आपल्याला बँकेच्या राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले होते. त्यानंतरही त्यांनी थोरातांच्या बैठकीला हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
-------------
फोटो - ०६ उदय शेळके, ०६ माधवराव कानवडे