दोन गटात तुंबळ हाणामारी
By Admin | Updated: June 30, 2014 00:35 IST2014-06-29T23:31:53+5:302014-06-30T00:35:16+5:30
पाथर्डी : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश बोरुडे व माजी नगरसेवक तुकाराम पवार यांच्या दोन गटात रविवारी (दि़२९) सकाळी तुंबळ हाणामारी झाली़

दोन गटात तुंबळ हाणामारी
पाथर्डी : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश बोरुडे व माजी नगरसेवक तुकाराम पवार यांच्या दोन गटात रविवारी (दि़२९) सकाळी तुंबळ हाणामारी झाली़ यात महेश बोरुडे, श्रीहरी बोरुडे, प्रमोद बोरुडे हे तिघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना अहमदनगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी बोरुडे यांच्यासह सुमारे सत्तर जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी किरकोळ कारणावरुन या दोन्ही गटांमध्ये वाद सुरु झाला़ या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले़ काठ्या, गज यांच्या सहाय्याने दोन्ही गटात सुमारे अर्धा तास धुमश्चक्री सुरु होती़ हाणामारीची माहिती कळताच शेवगाव रोडवर नागरिकांची मोठी गर्दी झाली़ या हाणामारीची माहिती समजल्यानंतर सायरन वाजवित पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला़ पोलिसांना पाहून दिसेल त्या मार्गाने हाणामारी करणाऱ्या युवकांनी धूम ठोकली़ या मारामारीत महेश बोरुडे, श्रीहरी बोरुडे व प्रमोद बोरुडे हे गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना पाथर्डीच्या उपजिल्हारुग्णालयात आणल्यानंतर तेथे मोठा जमाव जमा झाला. त्यानंतर जखमींना अहमदनगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले.
(तालुका प्रतिनिधी)
माजी नगरसेवकाची पोलिसात फिर्याद
माजी नगरसेवक तुकाराम पवार यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़ या फिर्यादीत म्हटले आहे की, माझा भाचा विलास हिरामन धोत्रे याला राहुल बोरुडे याने दुचाकी रस्त्याच्या बाजूला घेण्याच्या कारणावरुन मारहाण केली होती़ याचा जाब विचारायला गेलो असता त्याचा राग धरुन महेश बोरुडे, श्रीहरी बोरुडे, प्रमोद बोरुडे, बाबू सुभाष बोरुडे, बबन बुचकूल, राहुल बोरुडे यासह इतर साठ ते सत्तर जणांनी चप्पलच्या दुकानाची मोडतोड करुन नुकसान केले. पोलिसांनी बोरुडे यांच्यासह इतर साठ ते सत्तर जणांविराधोत गुन्हा दाखल केला आहे़