ओगदी दरोड्यातील दोन दरोडेखोर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:21 IST2021-02-16T04:21:29+5:302021-02-16T04:21:29+5:30

कोपरगाव : तालुक्यातील ओगदी येथे मागील महिन्यात दि. ९ जानेवारीला पहाटे तीन अज्ञात दरोडेखोरांनी घराचा दरवाजा तोडून कमलबाई लक्ष्मण ...

Two robbers arrested in Ogdi robbery | ओगदी दरोड्यातील दोन दरोडेखोर जेरबंद

ओगदी दरोड्यातील दोन दरोडेखोर जेरबंद

कोपरगाव : तालुक्यातील ओगदी येथे मागील महिन्यात दि. ९ जानेवारीला पहाटे तीन अज्ञात दरोडेखोरांनी घराचा दरवाजा तोडून कमलबाई लक्ष्मण जोरवर यांना मारहाण केली होती. त्यांच्याकडील रोख, दागिने असा ३ लाख १९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी त्याचदिवशी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोपरगाव पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करून दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद केले आहे, तर एक आरोपी फरार झाला असून अटकेतील आरोपीकडून ७६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, अशी माहिती कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी दिली आहे.

या दरोड्यातील सचिन उर्फ संजय उर्फ बोग्या सखाहरी चव्हाण (वय २८, रा.पढेगाव, ता.कोपरगाव ), सचिन विरूपण भोसले (वय २१, रा. गाजगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद ) या दोघांना अटक केली आहे. तर तिसरा दरोडेखोर संकेत मेहंद्या उर्फ महेंद्र चव्हाण (रा. शिर्डी, ता. राहाता ) हा फरार झाला आहे. अटकेतील दोनही आरोपींना कोपरगाव न्यायालयात हजर केले असता, दोघांनाही न्यायालयाने १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख, पोलीस कॉन्स्टेबल रमेश झडे, अंबादास वाघ व जयदीप गवारे यांच्या पथकाने केली.

Web Title: Two robbers arrested in Ogdi robbery