एकतर्फी प्रेमातून युवतीला जाळून मारणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 05:34 IST2018-03-29T18:37:46+5:302018-03-30T05:34:57+5:30
एकतर्फी प्रेमातून युवतीला तिच्या घरासमोर पेटवून देत तिचा खून केल्याप्रकरणी कर्जत पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे.

एकतर्फी प्रेमातून युवतीला जाळून मारणाऱ्या दोघांना अटक
कर्जत : एकतर्फी प्रेमातून युवतीला तिच्या घरासमोर पेटवून देत तिचा खून केल्याप्रकरणी कर्जत पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. तालुक्यातील कोरेगाव येथे २५ मार्च रोजी ही घटना घडली. परंतु नगर येथील उपचारादरम्यान युवतीचा बुधवारी (दि. २८) मृत्यू झाला.
आरोपींमध्ये शैलेश बारकू आडसूळ व किशोर छगन आडसूळ (रा. कोरेगाव) यांचा समावेश आहे. शैलेश आडसूळ याचे अश्विनी किसन कांबळे (वय २०) या युवतीवर एकतर्फी प्रेम होते. वर्षापूर्वी अश्विनीच्या आईने शैलेश माझ्या मुलीला फोन करून किंवा रस्त्याने जातांना त्रास देतो, अशी तक्रार केली होती. या तक्रारीनंतरही शैलेश मुलीला त्रास देत होता. २५ मार्च रोजी दुपारी तीन वाजता अश्विनी घरासमोर उभी असताना शैलेश आडसूळ व किशोर आडसूळ यांनी तिला पेटवून पळ काढला. भाजून गंभीर जखमी झालेल्या अश्विनीला नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु बुधवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
अश्विनी हिचा मृतदेह कोरेगाव येथे आणल्यानंतर आरोपींना अटक होईपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. परंतु आरोपींना बुधवारी सायंकाळी अटक केल्यानंतर अश्विनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.