शहरातील गर्दी रोखण्यासाठी आणखी दोन पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:28 IST2021-06-16T04:28:34+5:302021-06-16T04:28:34+5:30
अहमदनगर : कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे बाजारात गर्दी वाढली आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ...

शहरातील गर्दी रोखण्यासाठी आणखी दोन पथके
अहमदनगर : कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे बाजारात गर्दी वाढली आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेकडून आणखी दोन पथकांची लवकरच स्थापना केली जाणार आहे, अशी माहिती आयुक्त शंकर गोरे यांनी दिली.
कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले सर्व नियम शिथिल करण्यात आले आहेत. शहरासह उपनगरातील सर्व बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले आहेत. बाजारपेठेत होत असलेल्या गर्दीमुळे संसर्ग आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. पदाधिकारी व नगरसेवकांकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेने दक्षता पथकांची स्थापना केलेली आहे. आणखी दोन दक्षता पथकांची स्थापना केली जाणार असल्याचे गाेरे यांनी सांगितले.
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतरही मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. गर्दीतून कोरोनाचा संसर्ग होऊन दुसरी लाट आली. दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या वाढली होती. दुसरी लाट ओसरल्यामुळे नियम शिथिल करण्यात आले आहेत; परंतु पुन्हा गर्दी होऊ लागली असून, गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेकडून नियोजन करण्यात येत आहे.
......
दुकानदारांवर कारवाई
बाजारपेठेतील दुकानांमध्ये गर्दी होत आहे. नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत असून, दक्षता पथकाकडून दुकानांवर कारवाई केली जात आहे.