अपघातातील स्कॉर्पिओतून साडेसहा तोळ्यांसह दोन लाख चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:24 IST2021-08-22T04:24:57+5:302021-08-22T04:24:57+5:30
कोल्हार - संगमनेर रस्त्यावर कोंची शिवारात हाॅटेल पुरोहितजवळ स्कॉर्पिओ व पिकअपचा गुरुवारी (दि. १ जुलै) रात्री आठ वाजण्याच्या ...

अपघातातील स्कॉर्पिओतून साडेसहा तोळ्यांसह दोन लाख चोरीस
कोल्हार - संगमनेर रस्त्यावर कोंची शिवारात हाॅटेल पुरोहितजवळ स्कॉर्पिओ व पिकअपचा गुरुवारी (दि. १ जुलै) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नाशिक येथील आर. टी. सेंटर येथे हवालदार असलेले शक्तिभान अरुण रोकडे (वय ३६) हे सुट्टीसाठी अहमदनगरकडे जात होते. संगमनेर तालुक्यातील कोंची शिवारात लोणीहून संगमनेरकडे भरधाव वेगाने जात असलेल्या पिकअप (एम.एच.१६, सी. ए. ००९२)ने जोरदार धडक दिली होती. या धडकेत लष्करी जवान शक्तिभान अरुण रोकडे (वय ३६) पत्नी मनाली अरुण रोकडे व दोन मुले ही गंभीर जखमी झाली. त्यांना उपचारांसाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान शक्तिभान रोकडे यांचा मृत्यू झाला होता. याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात पिकअप चालकाच्या विरोधात मयत रोकडे यांची पत्नी मनाली रोकडे यांनी तक्रार दाखल केली होती. यानंतर त्यांना मानसिक धक्का बसला असल्याने त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते. यादरम्यान मयत जवान शक्तिभान रोकडे यांचे वडील अरुण दादा रोकडे यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याने त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. या उपचाराचे बिल भरण्यासाठी मनाली रोकडे हिने नाशिक येथून बॅगेत असलेले पैसे घेण्यासाठी सांगितले असता बॅगेतून सोन्याचे साडेसहा तोळे दागिने व दोन लाख पंचवीस हजार रोख असा सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी मनाली रोकडे हिने आश्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.