निराधार योजनांचे जिल्ह्यात दोन लाख लाभार्थी, लॉकडाऊनमध्येही लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 11:58 IST2020-10-07T11:57:49+5:302020-10-07T11:58:19+5:30
अहमदनगर : संजय गांधी निराधार योजनेसह नऊ योजनांचा जिल्ह्यातील २ लाख १७ हजार जण लाभ घेत आहेत. निराधार महिला -पुरुष, दिव्यांगांना दरमहा ७०० ते १२०० रुपयापर्यंत रक्कम वाटप करण्यात येते. लॉकडाऊनच्या काळातही नियमितपणे निराधारांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात प्रशासनाने आपली कामगिरी चोख बजावली आहे.

निराधार योजनांचे जिल्ह्यात दोन लाख लाभार्थी, लॉकडाऊनमध्येही लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे
अहमदनगर : संजय गांधी निराधार योजनेसह नऊ योजनांचा जिल्ह्यातील २ लाख १७ हजार जण लाभ घेत आहेत. निराधार महिला -पुरुष, दिव्यांगांना दरमहा ७०० ते १२०० रुपयापर्यंत रक्कम वाटप करण्यात येते. लॉकडाऊनच्या काळातही नियमितपणे निराधारांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात प्रशासनाने आपली कामगिरी चोख बजावली आहे.
संजय गांधी निराधार योजनेतंर्गत ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा (आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या विधवासह ), घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी, ३५ वर्षावरील अविवाहित स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ दिला जातो.
अहमदनगर जिल्ह्यात सद्यस्थितीला नऊ योजनांचे २ लाख १७ हजार ७६९ इतक्या लाभार्थ्यांना दरमहा ७०० ते १२०० रुपयापर्यंत रक्कम दिली जाते. सरासरी एक हजार रुपये प्रमाणे २ लाख १७ हजार ७६९ लाभार्थ्यांना सरासरी २१ कोटी रुपये इतकी रक्कम वाटप केली जाते.
निराधार योजनांची लाभार्थी संख्या दरमहा बदलते. काही लाभार्थी कमी होतात, तर नव्या लाभार्थ्यांची दरमहा भरही पडते. लॉकडाऊनच्या काळातही निराधार योजनांच्या लाभार्थ्यांना नियमितपणे रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार भारती सगरे यांनी दिली. दरम्यान शहरातील लाभार्थी आता महापालिकेकडून अर्थसहाय्य घेत असल्याने त्यांचे महसूल प्रशासनाकडून देत असलेले वेतन बंद करण्यात आले आहे. लाभार्थ्यांना कोणत्याही एकाच ठिकाणाहून लाभ मिळतो.