बोकड कापण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी; सहा जखमी, तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2017 19:59 IST2017-04-01T19:59:50+5:302017-04-01T19:59:50+5:30
बोकड कापण्याच्या कारणावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यात सहा जण जखमी झाले आहेत.

बोकड कापण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी; सहा जखमी, तिघांना अटक
>जामखेड, दि़. १- तालुक्यातील कवडगाव येथील देवस्थानजवळ बोकड कापण्याच्या कारणावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यात सहा जण जखमी झाले आहेत. याबाबत दोन्ही गटाकडून परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली आहे.
तालुक्यातील कवडगाव येथील अल्लाउद्दीन बाबा देवस्थान जवळ दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बाबा शेख (देवस्थानचा मुलानी) व बादशहा शेख यांच्यामध्ये बोकड कापण्याच्या कारणावरून आपसात भांडण चालू होते. यावेळी गणेश गायकवाड भांडण सोडवण्यासाठी गेला असता आरोपी बाबा शेख, सलमान बाबा शेख, दाऊद बाबा शेख, पुष्पा (पूर्ण नाव माहीत नाही) व इतर अनोळखी पाच लोकांनी फिर्यादी शैलेश गायकवाड, गणेश गायकवाड, विजय गायकवाड, शुभांगी गायकवाड, शुशाला गायकवाड यांना चाकू व अर्धवट जळालेल्या लाकडाने मारहाण करून जखमी केले, अशी फिर्याद शैलेश गायकवाड याने दिली.
दुसरी फिर्याद शेख बाबा शेखलाल (मुलानी) यांनी दिली. यानुसार देवस्थान शेजारी बादशहा शेख (मुसलमान वस्ती, कवडगाव) हा बोकड कापत होता. यावेळी बाबा शेख व बादशहा शेख यांच्यात भांडण सुरु होते. यावेळी शैलेश गायकवाड, गणेश गायकवाड, विजय गायकवाड, शुभांगी गायकवाड, गणेश गायकवाड यांनी शिवीगाळ दमदाटी करून लाथाबुक्क्याने त्यांना मारहाण केली.
दोन गटात झालेल्या मारहाणीत गणेश गायकवाड, विजय गायकवाड, शुभांगी गायकवाड, शुशाला गायकवाड, बाबा शेख, सलमान बाबा शेख हे जखमी झाले. पोलिसांनी दोन गटातील परस्पर विरोधी फिर्याद नोंद करून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बाबा शेख, सलमान शेख, व पुष्पा यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक उजागरे करीत आहेत.