श्रीगोंदा : येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या शासकीय कोरोना सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या दोघा आजोबांनी रेमडेसिविरविना ऑक्सिजनच्या साहायाने काेरोनावर मात केली आहे.
दत्तात्रय बनकर (रा. हिरडगाव, ता.श्रीगोंदा) व विठ्ठल चोरमले (रा. वांगदरी, ता. श्रीगोंदा), अशी त्या दोघा आजोबांची नावे असून, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे यश मिळविले.
श्रीगोंदा तालुक्यात सध्या सातशे कोरोनाबाधित रुग्ण आहेत. बाधितांना श्रीगोंदा येथील शासकीय, तसेच संत शेख महंमद महाराज, कोळगाव, घारगाव, पिंपळगाव पिसा, लोणी व्यंकनाथ, चिंभळे, बेलवंडी, आढळगाव, चांडगाव येथील कोविड सेंटर, तसेच खासगी रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आले आहे.
कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर सेवाभावी वृत्तीने उपचार करण्यात येत आहेत. डॉक्टर, कर्मचारी, सेवक, स्वयंसेवक त्यांची आस्थेने विचारपूस करतात.
हिरडगाव येथील ६८ वर्षीय दत्तात्रय बनकर व वांगदरी येथील ८० वर्षीय विठ्ठल चोरमले यांचा एचआरसीटी स्कोअर २३ होता. नातेवाईक घाबरून गेले होते. मात्र, तालुका वैद्यकीय अधिकारी नितीन खामकर यांनी त्यांना धीर दिला. रेमडेसिविर इंजेक्शन न घेण्याचा सल्ला दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्सिजन व गोळ्या, औषधांवर या दोघा आजोबांनी आठव्या दिवशी कोरोनावर मात केली.
---
म्हातारे असतानाही कोरोनाला हरवले
आम्ही मावळतीकडे निघालो होतो. डॉ. नितीन खामकर यांच्या रूपाने देवच भेटला. त्यांनी आधार आणि ऑक्सिजन दिला. त्यातून आम्ही बरे झालो. त्यामुळे तरुणांनो तुम्ही कोरोनाला घाबरू नका. कोरोनाची भीती घेतली की फजिती होते. आमचीही सुरुवातीला झाली होती.
-विठ्ठल चोरमले, दत्तात्रय बनकर
(कोरोनामुक्त झालेले ज्येष्ठ नागरिक)
---
तालुक्यात शासकीय, खासगी कोविड सेंटरमध्ये चांगली वैद्यकीय सेवा मिळत आहे. त्यामुळे कोरोनावर अनेकांनी मात केली आहे. आता कोरोनाची लाट ओसरत चालली आहे. लसीकरणही होत आहे. कोरोनाशी लढण्याची समाजाची मानसिकता झाली आहे. मात्र, काही जण विनाकारण घाबरून जातात. कोणीही घाबरू नका. मास्क वापरा. हात वेळोवेळी धुवा.
-नितीन खामकर,
तालुका वैद्यकीय अधिकारी, श्रीगोंदा
---
२९ श्रीगोंदा आजोबा
श्रीगोंदा येथील शासकीय कोविड सेंटरमध्ये कोरोनामुक्त झालेले दोघे आजोबा व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर.