दोन कुटुंबावर खुनी हल्ला; सात जखमी, तिघांची प्रकृती गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2017 17:21 IST2017-07-02T17:21:36+5:302017-07-02T17:21:36+5:30
दोन कुटुंबांवर तलवार, हॉकी स्टीक, गज, काठीने खुनी हल्ला केला. यामध्ये सातजण जखमी झाले असून, पैकी तिघा जणांची प्रकृती गंभीर आहे.

दोन कुटुंबावर खुनी हल्ला; सात जखमी, तिघांची प्रकृती गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
काष्टी : मनसेचे माजी श्रीगोंदा तालुका उपाध्यक्ष सुभाष चौधरी व त्याच्या साथीदारांनी पूर्ववैमनस्यातून शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांवर तलवार, हॉकी स्टीक, गज, काठीने खुनी हल्ला केला. यामध्ये सातजण जखमी झाले असून, पैकी तिघा जणांची प्रकृती गंभीर आहे.
हल्लेखोरांनी दोन कार, ट्रॅक्टर व मोटारसायकलचीही मोडतोड केली. घटनेतील सर्व आरोपी फरार आहेत. काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील चौधरी मळ्यात ही घटना घडली. जखमींमध्ये श्रीकृष्ण काशिनाथ मखरे, अनिता श्रीकृष्ण मखरे (वय २८), पुष्कर श्रीकृष्ण मखरे (वय १०), आबासाहेब मखरे (वय २५), काशिनाथ विनायक मखरे (वय ५६), मंगल संतोष गोरे (वय ४०), इंदुबाई गोरे (वय ७५) यांचा समावेश आहे. पैकी श्रीकृष्ण मखरे, इंदुबाई गोरे व मंगल गोरे यांची प्रकृती गंभीर आहे.
याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आबासाहेब काशिनाथ मखरे यांनी फिर्याद दिली. मनसेचे माजी तालुका उपाध्यक्ष सुभाष कोंडिबा चौधरी, वैशाली सुभाष चौधरी, शुभांगी सुभाष चौधरी, वैभव सुभाष चौधरी (रा. काष्टी ता. श्रीगोंदा) तर गणेश समाधान दरेकर (रा.गोपाळवाडी ता.दौंड जि.पुणे), ऋतीक लगड (रा. श्रीगोंदा), गणेश कचरे (रा. अजनूज ता. श्रीगोंदा) यांच्यासह इतर आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुभाष कोंडिबा चौधरी आणि काशिनाथ मखरे यांचा गेल्या पाच वर्षापासून न्यायालयात जमिनीचा वाद आहे. या वादातून यापूर्वी अनेकदा दोन गटात वादावादीचेही प्रकार घडले. सुभाष कोंडिबा चौधरी व त्याच्या दहा ते बारा साथीदारांनी रस्त्यावर ट्रॅक्टर आडवा लावून मखरे यांच्या गाडीवर लाकडी दांडके, गज, काठीने मारहाण करून काचा फोडल्या व श्रीकृष्ण व त्यांचा मुलगा पुष्कर याला तलवार व लोखंडी गजाने बेदम मारहाण करीत असताना घरी जाऊन वडील काशिनाथ, पत्नी अनिता, भावजय रूपाली यांना मारहाण केली़ मखरे कुटुंबाला चौधरी यांच्याकडून मारहाण होत असताना ही मारहाण सोडविण्यास गेलेल्या मंगल गोरे, इंदूबाई बापूराव गोरे या शेजाऱ्यांनाही चौधरी यांच्या गटाकडून मारहाण केली़ इंदूबाई यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जखमी केले़ आरडाओरडा झाल्याने आरोपी वाहने जागेवर सोडून उसाच्या शेतातून पसार झाले.
घटनेनंतर सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. इंदूबाई गोरे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुणे येथे हलविण्यात आले. मंगल गोरे दौंड येथे उपचार घेत आहेत. श्रीकृष्ण मखरे नगर येथे उपचार घेत आहेत. त्यांच्या डोक्यावर तलवारीचे मोठे वार आहेत. पोलीस दोन तासांनी घटनास्थळी आल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. पोलीस उपनिरीक्षक नीलेश कांबळे यांना नागरिकांनी आरोपींनी वापरलेली हत्यारे, पाच वाहने दाखविली. ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.