दोन कुटुंबीयांत मारहाण, एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:26 IST2021-06-09T04:26:44+5:302021-06-09T04:26:44+5:30
याबाबत राजूर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, खडकी बु. येथील भगवंता शंकर बांडे आणि भीमा चिंतामण बांडे या दोन ...

दोन कुटुंबीयांत मारहाण, एकाचा मृत्यू
याबाबत राजूर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, खडकी बु. येथील भगवंता शंकर बांडे आणि भीमा चिंतामण बांडे या दोन कुटुंबीयांत रविवारी सायंकाळी जुन्या वादावरून भांडण सुरू झाले. यातील आरोपी भीमा चिंतामण बांडे, हरिचंद्र बाजीराव बांडे आणि स्वप्नील भीमा बांडे (सर्व रा. खडकी बु.) यांनी संगनमत करून हातात लोखंडी पाइप व काठ्या घेऊन फिर्यादी भगवंता बांडे यांच्या घरासमोर येऊन फिर्यादीस व त्यांच्या तीन मुलांना मारहाण केली. यात फिर्यादीचा मुलगा काळू आणि बाळू बांडे यांना भीमा आणि हरिचंद्र बांडे यांनी हातातील पाइपने मारहाण केली. त्यात ते जखमी झाले. तसेच फिर्यादीचा दुसरा मुलगा बाळू यास स्वप्नील बांडे याने काठीने डोक्यावर मारून जखमी केले आणि आरोपी भीमा आणि हरिचंद्र बांडे यांनी त्यांच्या हातातील पाइने बाळूच्या डोक्याला मारहाण केली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. भगवंता बांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भीमा बांडे, हरिचंद्र बांडे आणि स्वप्नील बांडे यांच्या विरोधात भादंवि कलम ३०२, ३२४ आणि ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
या सर्व आरोपींना सोमवारी सकाळी पोलिसांनी अटक केली असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी सांगितले. सोमवारी दुपारी पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांनी राजूर पोलीस ठाण्यास भेट दिली. साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार या घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान, या सर्व आरोपींना सोमवारी अकोले येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.