जिल्ह्यात उद्या चिमुकल्यांना ‘दोन थेंब जीवनाचे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:38 IST2021-02-05T06:38:36+5:302021-02-05T06:38:36+5:30

लोकमत न्यूज नेवटर्क अहमदनगर : जिल्ह्यात उद्या, रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. नगर जिल्ह्यात सुमारे ...

'Two drops of life' to Chimukalya in the district tomorrow | जिल्ह्यात उद्या चिमुकल्यांना ‘दोन थेंब जीवनाचे’

जिल्ह्यात उद्या चिमुकल्यांना ‘दोन थेंब जीवनाचे’

लोकमत न्यूज नेवटर्क

अहमदनगर : जिल्ह्यात उद्या, रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. नगर जिल्ह्यात सुमारे साडेचार लाख बालकांना चार हजार बूथवर ही लस दिली जाणार आहे. आरोग्य विभागाने तशी तयारी केली आहे.

लसीकरणाकरिता ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना ग्रामीण भागात ३ लाख ७७ हजार ३५८, शहरी भागात १६ हजार ६६९ व महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ४६ हजार २६० असे जिल्ह्यामध्ये एकूण ४ लाख ४० हजार २८७ बालकांना पोलिओ लसीचे डोस पाजण्यात येणार आहेत. उद्या, रविवारी ग्रामीण भागात ३ हजार ५२१ बूथ, शहरी भागात ८७ व महानगरपालिका क्षेत्रात ३७४ असे एकूण जिल्ह्यामध्ये ३ हजार ९८२ बूथवर एकूण ९ हजार ११० कर्मचाऱ्यांमार्फत पोलिओ लसीचे डोस पाजण्यात येणार आहेत. राज्यस्तरावरून अहमदनगर जिल्ह्याकरिता ६ लाख १० हजार डोस प्राप्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.

नागरिकांनी या मोहिमेमध्ये आपल्या ० ते ५ वर्षे वयाच्या बालकांना यापूर्वी पोलिओ डोस दिला असला तरी या मोहिमेमध्ये पुन्हा पोलिओ डोस घेऊन राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम १०० टक्के यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश शिंदे यांनी केले आहे.

-----------------

लसीकरण रविवारी होणार आहे. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी तांत्रिक खंड घेऊन ग्रामीण भागात २ फेब्रुवारीपासून ३ दिवस व शहरी भागात सलग ५ दिवस घरोघरी जाऊन राहिलेल्या बालकांना शोधून पोलिओ लस पाजण्यात येणार आहे.

----------

मोबाईल टीमद्वारेही लसीकरण

पोलिओ लसीपासून एकही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी जिल्ह्यात १०३ ट्रान्झिट टीमद्वारे बसस्टँड, रेल्वे स्थानक, धार्मिक स्थळे, आदी ठिकाणी व १३१ मोबाईल टीमद्वारे ऊसतोड कामगार, भटके लोक, रस्त्यावरील मजुरी करणाऱ्या लोकांची मुले यांना पोलिओ लसीचे डोस पाजण्यात येणार आहेत.

-----------

मोहिमेच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुणालये, नगरपालिका दवाखाने व महानगरपालिका येथील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहभाग नोंदवावा.

- डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्याधिकारी

----------

० ते ५ वर्षे बालके - ४ लाख ४० हजार २८७

पोलिओ डोस प्राप्त - ६ लाख १० हजार

एकूण बूथ - ३ हजार ९८२

आरोग्य कर्मचारी - ९ हजार ११०

मोबाईल पथक - १३१

ट्रान्झिट पथक - १०३

वेळ - सकाळी ८ सायं. ५

Web Title: 'Two drops of life' to Chimukalya in the district tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.