श्रीगोंद्यात ऑक्सिजन अभावी दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:21 IST2021-04-22T04:21:58+5:302021-04-22T04:21:58+5:30
श्रीगोंदा : येथील ग्रामीण रूग्णालयात ऑक्सिजन अभावी दोघांचा मृत्यू झाला. या दोघांसह तालुक्यातील खासगी व शासकीय कोविड सेंटरमध्ये मिळून ...

श्रीगोंद्यात ऑक्सिजन अभावी दोघांचा मृत्यू
श्रीगोंदा : येथील ग्रामीण रूग्णालयात ऑक्सिजन अभावी दोघांचा मृत्यू झाला. या दोघांसह तालुक्यातील खासगी व शासकीय कोविड सेंटरमध्ये मिळून अकरा जणांचा कोरोनाने बुधवारी मृत्यू झाला. एकाच दिवशी कोरोनाने एवढ्या संख्येने मृत्यू होण्याची तालुक्यातील ही पहिलीच वेळ आहे.
ग्रामीण रूग्णालयात २९ जणांवर उपचार सुरू आहेत. सकाळी अकरा वाजता ग्रामीण रूग्णालयात ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत झाला. ऑक्सिजन नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांची धांदल उडाली. ऑक्सिजन बेडवर असलेल्या रूग्णांचेही हाल होऊ लागले. दरम्यान ही बाब माजी आमदार राहुल जगताप यांना समजली. त्यांनी कुकडी साखर कारखान्यावरून तत्काळ पाच ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिले. ताेपर्यंत एका रूग्णाचा मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ दुसरा रूग्णही मृत्यूमुखी पडला.
याशिवाय दिवसभरात शासकीय व खासगी कोविड सेंटरमध्ये मिळून अकरा जणांचा मृत्यू झाला. श्रीगोंदा येथील स्मशानभूमीत नऊ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच दिवशी एवढे अंत्यसंस्कार करण्याचीही पहिलीच वेळ होती. तालुक्यात दहा दिवसात २९ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. रेमडेसिविर मिळत नसल्याने रूग्णांच्या नातेवाईकांना तासन्तास तास मेडिकलसमोर बसावे लागत आहे.
--
ऑक्सिजन यंत्रणा बंद पडण्यापूर्वीच एकाचा मृत्यू झाला तर ऑक्सिजन यंत्रणा बंद झाल्यानंतर दुसऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर कुकडी साखर कारखान्यावरून ऑक्सिजन सिलेंडर आणून यंत्रणा सुरळीत झाली. सध्या ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यावर आम्ही तरी काय करू शकतो.
-संघर्ष राजुळे,
वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रूग्णालय, श्रीगोंदा
---
गेल्या वर्षभरात श्रीगोंदा येथील अमरधाममध्ये आम्ही ५० कोरोना बाधित मृतांवर अंत्यसंस्कार केले. मात्र बुधवारी एकाच दिवशी ९ जणांवर अंत्यसंस्कार केले. त्या भडकलेल्या ज्वाला पाहून आमचेही काळीज फाटले. मात्र आमचाही नाईलाज आहे.
-आकाश घोडके, वाल्मिक काळे
अंत्यसंस्कार करणारे युवक, श्रीगोंदा
---
२१ श्रीगोंदा कोरोना
श्रीगोंदा येथील स्मशानभूमीत बुधवारी नऊ मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.