दोन दुचाकींची धडक होत अपघातात एक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:21 IST2021-05-07T04:21:07+5:302021-05-07T04:21:07+5:30
संगमनेर- कोपरगाव रस्त्यावर बुधवारी ( दि. ५ ) रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. तळेगाव दिघेमार्गे असलेल्या ...

दोन दुचाकींची धडक होत अपघातात एक जागीच ठार
संगमनेर- कोपरगाव रस्त्यावर बुधवारी ( दि. ५ ) रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली.
तळेगाव दिघेमार्गे असलेल्या संगमनेर - कोपरगाव रस्त्याने संगमनेरकडून तळेगाव दिघे गावाच्या दिशेने दिलीप निवृत्ती दिघे हे दुचाकीवरून प्रवास करीत होते. दरम्यान बबन सीताराम दिघे हे संगमनेरच्या दिशेने दुचाकीवरून चालले होते. बुधवारी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास तळेगाव दिघे शिवारातील जुन्या खडी क्रशरनजीक दोन्ही दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होत अपघात झाला. या अपघातात जबर मार लागल्याने बबन सीताराम दिघे हे जागीच ठार झाले, तर दिलीप निवृत्ती दिघे हे गंभीर जखमी झाले. जखमी दिलीप दिघे यांना तातडीने संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. अपघाताच्या घटनेनंतर उपसरपंच रमेशभाऊ दिघे, ग्रामपंचायत सदस्य चांगदेव दिघे, युवक कार्यकर्ते संतोष दिघे यांनी मदतकार्य केले. अपघाताची माहिती समजताच पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण औटी, पोलीस नाईक बाबा खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेत मृत बबन दिघे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविला. याप्रकरणी भास्कर सीताराम दिघे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अपघातास कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून दिलीप निवृत्ती दिघे यांच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाबा खेडकर अधिक तपास करीत आहे.
............
०५ तळेगाव दीघे
तळेगाव दिघे येथील शिवारात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होत भीषण अपघात झाला.