राबताहेत अडीच हजार चिमुकले हात
By Admin | Updated: June 12, 2014 00:09 IST2014-06-11T23:38:02+5:302014-06-12T00:09:03+5:30
बालकामगार विरोधी दिन विशेष : यशदाचे सर्वेक्षण

राबताहेत अडीच हजार चिमुकले हात
अण्णासाहेब नवथर, अहमदनगर
सुट्या संपून शाळा पुढच्या आठवड्यात सुरू होतील़ खांद्यावर पाटी दप्तर घेऊन चिमुकले घराबाहेर पडतील़ मात्र शहरासह जिल्ह्यात अडीच हजार बालके राबत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली असून, याविषयी येथील कामगार कार्यालयाने बघ्याची भूमिका घेतली आहे़ त्यामुळे बाल कामगार कायद्याच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़
राज्य बालकामगारमुक्त व्हावे, यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत़ बालकामगारांची सुटका करण्यासाठी बालकामगार विरोधी कायदा मंजूर करण्यात आला़ बालकामगार शोधून त्यांना मुख्यप्रवाहात आणण्याची जबाबदारी कामगार कार्यालयावर सोपविण्यात आली़ मात्र या कार्यालयाने वर्षभरात एकाही बालकाची सुटका केली नसून, या कार्यालयाला अद्यापही पाझर फुटला नसल्याचे दिसून येते़ यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनीने येथील स्वास्थ दर्पण, या संस्थेच्या सहकार्याने नगर शहरासह जिल्ह्यातील बालकामगारांचे सर्वेक्षण केले़ या संस्थेने १८ फेब्रुवारी ते ३ मार्च २०१२ या काळात केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरासह जिल्ह्यात २ हजार ५९१ बालकामगार आहेत़ हा अहवाल यशदाने कामगार कार्यालयास सादर केला़ ही वस्तुस्थिती असली तरी कार्यालयास वर्षभरात एकही बाल कामगार काम करताना आढळून आला नाही, तसा दावा कामगार कार्यालयाने केला आहे़ संबंधित कार्यालयाने यशदाला खोटे ठरवित बाल कामगार नसल्याचे सांगून बालकामगारांच्या दु:खावर एकप्रकारे मीठ चोळण्याचा प्रयत्न चालविला आहे़
कामगार कार्यालयाने वर्षभरात १४ वेळा धाडसत्र राबविले़ परंतु यातील नियुक्त अधिकाऱ्यांना बालकामगार आढळून आला नाही़ यशदाने बालकामगारांची संख्या अडीच हजारांच्यावर असल्याचे सांगितले आहे़
अशी आहे शिक्षा
बालकामगार काम करत असलेल्या मालकास
१ वर्षाचा कारावास व १० हजार रुपये दंड करण्याची तरतूद बालहक्क कायद्यात आहे़
प्रमुख अधिकाऱ्यांवर जबाबदारी
जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, निवासी उपजिल्हाधिकारी,महिला व बालकल्याण विकास अधिकारी, जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिका आयुक्त
वर्षभरात ३३० आस्थापनांची पडताळणी केली़ १४ धाडसत्र राबविण्यात आले़ एकही बालकामगार आढळून आला नाही़ दोन तक्रारी आल्या होत्या़ परंतु त्यात तथ्य नसल्याचे आढळून आले़
-बाळासाहेब वाघ, सहाय्यक आयुक्त, कामगार कार्यालय
बालकामगारांचा प्रश्न गंभीर आहे़ मात्र तक्रारी सादर करण्यासाठी राज्यात बाल हक्क आयोग गठीत करण्यात आला नाही़ तो गठीत करण्यात यावा,यासाठी आंदोलन सुरू असून, राज्य शासनाचे लक्ष वेधले जात आहे़
-राजेंद्र काळे, सामाजिक कार्यकर्ते
असे आहेत बालकामगार
नगरशहर- ३८८, संगमनेर-९४,कोपरगाव-५१८, राहाता-११८, श्रीरामपूर-२३, पाथर्डी-२०९, नेवासा- १७३, राहुरी- ७९८, कर्जत-२३, श्रीगोंदा- १४१, अकोला-३२, पारनेर- ३४, शेवगाव- ४०
कायदा काय सांगतो
बालकायदा १९८६ नुसार १४ वर्षाखालील बालकांना कामावर घेऊ नये
बालकांची शारीरिक व मानसिक हानी होणार नाही
मानसिक विकास खुंटेल,असे धोकादायक काम देऊ नये