वीज बंद, पाणी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 15:00 IST2017-08-25T14:59:05+5:302017-08-25T15:00:34+5:30
विजेचे बिल थकविल्याने महावितरणने श्रीरामपूर नगरपालिकेच्या काही कूपनलिकांचा (बोअर) वीज पुरवठा खंडित केला. वीजबिल थकबाकीमुळे वीज खंडित होण्याची ही पालिकेच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.

वीज बंद, पाणी बंद
ठळक मुद्देश्रीरामपूर पालिका थकबाकीमुळे कूपनलिकांची वीज खंडित
श रीरामपूर : विजेचे बिल थकविल्याने महावितरणने श्रीरामपूर नगरपालिकेच्या काही कूपनलिकांचा (बोअर) वीज पुरवठा खंडित केला. वीजबिल थकबाकीमुळे वीज खंडित होण्याची ही पालिकेच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. पाण्याचे दुर्भिक्ष टाळण्यासाठी तत्कालिन आमदार जयंत ससाणे यांनी दूरदृष्टी ठेऊन आपल्या आमदार निधीतून प्रत्येक प्रभागात दोन दोन अशा सुमारे ७० कूपनलिका बसविल्या. त्यावर पालिकेच्या खर्चाने वीज मोटारी बसवून जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा करून नागरिकांना दिलासा दिला. यामुळे पाण्याची अडचण दूर होऊन नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. पिण्याच्या पाण्यावर ताण पडू नये व चांगल्या पाण्याची नासाडी होऊ नये, अशा हेतूने या विंधन विहिरी घेऊन ससाणे यांनी नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिली होती. गेल्या १५ वर्षांपासून या कूपनलिकांवरून नागरिकांना सातत्याने पाणीपुरवठा होत होता. गेल्या ८ दिवसांपासून पाणी येणे बंद झाल्याने नागरिकांनी पालिकेकडे विचारणा केली असता पालिकेने वीज बिल थकविल्याने वीज खंडित झाल्याची बाब पुढे आली. पालिका कूपनलिकांसाठी नागरिकांकडून स्वतंत्र पाणीपट्टी आकारीत आहे. अचानक पाणी येणे बंद झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्यांच्याकडे थकबाकी असेल त्यांचे नळजोड पालिकेने खंडित करावे किंवा करू नये हा त्यांचा अधिकार आहे मात्र ज्या नागरिकांनी यासाठी अगोदर पाणीपट्टी भरली आहे किमान त्यांची तरी गैरसोय करू नये असे नागरिकांचे म्हणणे आहे. मोठे गरीब कुटूंब असणाºयांसाठी कूपनलिकांचे पाणी नागरिकांच्या गरजा भागवित होते. आता त्यांच्यापुढे संकट उभे ठाकले आहे. सकाळी नळाला येणारे पाणी मोठमोठ्या कुटुंबासाठी पुरेसे पडत नाही तर पाणी साठविण्यासाठी व्यवस्था नसलेल्या गरीब कुटुंबावर आता बाहेरचे पाणी विकत घेऊन आपली गरज भागविण्याची वेळ आली आहे. पालिकेच्या या अनास्थेमुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.