अभियंत्याला घातला बंद ट्युबलाईटचा हार
By Admin | Updated: September 20, 2015 00:50 IST2015-09-20T00:42:52+5:302015-09-20T00:50:06+5:30
अहमदनगर: तोफखाना, दिल्लीगेट परिसरातील प्रभाग १७ मधील बंद पडलेले पथदिवे सुरू करण्यासाठी पाठपुरावा करुनही ते सुरू झाले नाहीत.

अभियंत्याला घातला बंद ट्युबलाईटचा हार
अहमदनगर: तोफखाना, दिल्लीगेट परिसरातील प्रभाग १७ मधील बंद पडलेले पथदिवे सुरू करण्यासाठी पाठपुरावा करुनही ते सुरू झाले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेले नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनी विद्युत विभागातील अभियंत्यास बंद पडलेल्या ट्युब लाईटचा हार घातला. अनोख्या पध्दतीचे गांधीगिरी आंदोलन करताच ट्युबलाईट सुरू करण्यासाठी तातडीने मनपाचे वायरमन प्रभागात साहित्यासह रवाना झाले.
सतरा नंबर प्रभागात मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरी सुविधांचा आभाव आहे. प्रशासनाकडे वारंवार मागणी करुनही प्रभागातील कामे होत नाहीत. सर्वाधिक विद्युत विभागाच्या तक्रारींचा समावेश आहे. विद्युत अभियंता बाळासाहेब सावळे यांना वारंवार निवेदन देऊनही प्रभागातील बंद पडलेले पथदिवे, हायमास्ट सुरु न झाल्याच्या निषेधार्थ शनिवारी नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनी प्रभागातील बंद पडलेल्या पथदिव्यांच्या ट्युब व चोक यांचा हार करुन अभियंता सावळे यांना घालून अनोखे गांधीगिरी आंदोलन केले, तसेच अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. गणेशोत्सव काळात प्रभागात अंधार आहे. काही भागात रात्री आठनंतर पथदिवे सुरू होतात. साहित्य व कर्मचारी नसल्याचे कारण देत विद्युत अभियंता बाळासाहेब सावळे हे निष्क्रीयपणा करत असल्याचा आरोप करत त्यांचा निषेध म्हणून प्रभागातील पथदिव्यांच्या गेलेल्या ट्युब व चोक यांचा हार घालून त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल सत्कार करण्यात येत असल्याचे छिंदम यांनी यावेळी सांगितले. तसेच प्रभागात मोकाट कुत्र्यांचाही मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असून तक्रार करूनही मोकाट कुत्रे पडकले जात नाहीत. मनपा प्रशासनाने दोन दिवसांच्या आत मोकाट कुत्र्यांवर कारवाई केली नाही, तर हे मोकाट कुत्रे पकडून आयुक्तांच्या दालनात सोडण्याचा इशारा यावेळी नगरसेवक छिंदम यांनी दिला.
आंदोलन सुरू असतानाच अतिरिक्त आयुक्त वालगुडे यांनी विद्युत विभागाचे प्रभारी अभियंता आर. जी. सातपुते यांना तत्काळ बोलावून तातडीने उपाययोजना करण्याचा सूचना दिल्या. निष्क्रीय कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. सातपुते यांनी तत्काळ विद्युत विभागाच्या वायरमनला साहित्य घेऊन प्रभागात रवाना केले. आंदोलनात महेश सब्बन, विजय सामलेटी, अभिजित चिप्पा, अमोल बोल्ली, नंदकिशोर शिरापुरी, सागर बल्लाळ, संदीप बोडखे, संतोष ठाकूर, अमृत वन्नम, कुणाल गोसके, सनी कारंपुरे आदी सहभागी झाले होते.
(प्रतिनिधी)