पाणी संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न करणार
By Admin | Updated: November 29, 2014 00:00 IST2014-11-28T23:54:38+5:302014-11-29T00:00:53+5:30
कोपरगाव :भविष्यात पाण्यासाठी होणारा संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी दिली़

पाणी संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न करणार
कोपरगाव : माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचा पाटपाण्याचा संघर्ष संपूर्ण राज्याला माहित आहे़ तुटीच्या उर्ध्व गोदावरी खोऱ्यात पाणी आणण्यासाठी पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना राज्यात नव्याने स्थापन झालेले भाजपाचे सरकार प्राधान्य देईल, भविष्यात पाण्यासाठी होणारा संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी दिली़
संजीवनी उद्योग समूहास सभापती हरिभाऊ बागडे यांनी भेट दिली़ त्याप्रसंगी त्यांचा माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी सत्कार केला़ प्रारंभी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत करून या विधानसभा मतदारसंघाचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न मांडले़ यावेळी तहसीलदार इंदिरा चौधरी, मच्छिंद्र टेके, अमित कोल्हे, साईनाथ रोहमारे, विश्वासराव महाले, अरूणराव येवले, बापूसाहेब औताडे, केशव भवर, मच्छिंद्र लोणारी आदी उपस्थित होते़
शंकरराव कोल्हे यावेळी म्हणाले, उर्ध्व गोदावरी खोरे अत्यंत तुटीचे आहे़ असे असताना येथील शेतकऱ्यांवरच मोठ्या प्रमाणात अन्याय केला जातो़ धरणात पाणी असूनही शेतीला ते दिले जात नाही़
समन्यायी पाणी वाटपाचा कोलदांडा आमच्या मानगुटीवर बसला आहे़ त्यामुळे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले़ गेल्या तीन वर्षापासून येथे दुष्काळ आहे, शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आहे, त्याला तात्काळ मदत करण्याची मागणी कोल्हे यांनी केली़
सभापती हरिभाऊ बागडे पुढे म्हणाले, माजी मंत्री कोल्हे यांच्या पाण्याच्या अभ्यासाचा उपयोग राज्याला कसा होईल, याचा प्रयत्न करू ़ पाणी कसे वाढवायचे याचे प्रयत्न आपण केले पाहिजे़ तुटीच्या खोऱ्यात पाणी वाढविण्यासाठी जे जे प्रयत्न सिंचन तज्ज्ञांनी सांगितले ते ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करू ़ स्नेहलता कोल्हे या महिला आमदार म्हणून ऐतिहासिक मताधिक्याने विजयी झाल्या़ त्यांनी गोरगरीब उपेक्षित, दीन, दलितांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे, आपला आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी आहे, त्यांच्याद्वारे विधीमंडळात उपस्थित होणाऱ्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सभापती या नात्याने आपण काम करू. शेवटी संचालक बाळासाहेब वक्ते यांनी आभार मानले़
(प्रतिनिधी)