मुलगा असल्याचे भासवून जमीन लुबाडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 17:20 IST2018-11-13T17:20:43+5:302018-11-13T17:20:55+5:30
शाळेचा बनावट दाखला दाखवून मुलगा असल्याचे भासवून जमीन लुबाडण्याच्या उद्देशाने वृध्दाची फसवणूक करणाऱ्या इसमाविरोधात राहाता पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मुलगा असल्याचे भासवून जमीन लुबाडण्याचा प्रयत्न
राहाता : शाळेचा बनावट दाखला दाखवून मुलगा असल्याचे भासवून जमीन लुबाडण्याच्या उद्देशाने वृध्दाची फसवणूक करणाऱ्या इसमाविरोधात राहाता पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
राहाता पोलिसात भिवाजी गंगाधर गोडगे ( वय ६०, रा. केलवड ) यांनी फिर्याद दिली. यात त्यांनी म्हटले आहे की, मी माझ्या पत्नीसोबत केलवड येथे राहत असून लग्नानंतर आम्हाला १८ जुलै १९८५ मध्ये एक अपंग मुलगा झाला. त्याचे नाव आम्ही किरण ठेवले. मात्र तो दहा वर्षाचा झाल्यानंतर आम्हाला त्याला पोसणे अवघड झाल्याने आम्ही त्याला १ जून १९९५ रोजी नासिक आडगाव येथील प्रेमदान मदर तेरेसा आश्रमात टाकले. दरम्यान आमच्या भावकीतील तेरेजा बापू गोडगे ही महिला एक दिवस केलवड या ठिकाणी आली. तुमचा मुलगा मोठा झाला असून तो व्यवस्थित आहे. तो आता गोव्यात राहतो. मी तुमची भेट घालून देते, असे सांगितल्याने या महिलेच्या सांगण्यावरुन आम्ही त्या महिलेचा भाऊ साईनाथ बापू गोडगे, मी व माझी पत्नी गोव्याला आमचा मुलगा पाहण्याकरीता गेलो. त्यांनी प्रदीप नावाच्या मुलाची आम्हाला भेट घडवून हा तुमचा मुलगा आहे असे सांगितले. तुम्हाला जर तुमचा मुलगा परत न्यायचा असेल तर आश्रमाकरिता साठ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. आमच्याकडे इतके पैसे नाहीत. शेवटी तडजोड करुन चाळीस हजार रुपये तेरेजा गोडगे या महिलेला देऊन मुलगा घरी घेऊन आलो.
मार्च २०१३ ते २७ सप्टेंबर २०१९ दरम्यान या मुलाला घरी आणल्यानंतर तो काही दिवसातच आमच्याशी व्यवस्थित बोलत नव्हता. एक वर्षानंतर आम्ही या मुलाचे लग्न करुन दिले. त्याला एक मुलगाही झाला. यानंतर तो आम्हाला अधिक त्रास देत जिवे मारण्याची धमकी देत छळ करु लागला. मुलगा आमच्याशी परक्यापणे वागत असल्याने हा आमचाच मुलगा आहे का? याची चौकशी केली असता त्याच्या जवळील शाळेचा दाखला बनावट असल्याचे लक्षात आले. यानंतर आम्ही ज्या आश्रमात मुलगा टाकला होता, तेथे मुलाची चौकशी केली असता आमचा मुलगा आश्रमात भर्ती केल्यानंतर चार महिन्यात मयत झाल्याचे सांगण्यात आले, असे फिर्यादीत म्हटले आहे.