‘आर्द्रा’वर भिस्त
By Admin | Updated: June 22, 2014 00:19 IST2014-06-21T23:59:43+5:302014-06-22T00:19:58+5:30
अहमदनगर : मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदार सलामी दिली. मात्र, त्यानंतर पावसाने ताण दिल्याने जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरण्या रखडल्या आहेत.
‘आर्द्रा’वर भिस्त
अहमदनगर : मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदार सलामी दिली. मात्र, त्यानंतर पावसाने ताण दिल्याने जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरण्या रखडल्या आहेत. नगर तालुक्यात काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पेरण्या सुरू झाल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील पेरण्यांची टक्केवारी एक टक्क्यांच्या पुढेही सरकलेली नाही. रविवार (आज) पासून आर्द्रा नक्षत्र सुरू होत असून त्यावर खरिपाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
गेल्या वर्षी २९, ३० मे आणि १ जूनला झालेल्या दमदार पावसावर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या. जून महिन्यात पावसाळ्यातील सरासरी २० टक्के पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र, आतापर्यंत आशादायक चित्र नाही. नगर शहर आणि तालुक्यातील काही भाग वगळता अद्याप मोठा पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. गेल्या काही वर्षापासून पावसाच्या सुरूवातीला पाऊस पडत नसल्याने खरिपाचे नियोजन कोलमडताना दिसत आहे.
या हंगामात प्रामुख्याने बाजारी, कपाशी, सोयाबीन यासह दक्षिण जिल्ह्यात कडधान्यांची पिके घेतली जातात. कडधान्यासाठी सरासरी १५ ते २० जून पर्यंत झालेल्या पावसावर कडधान्य पिकांचे भवितव्य ठरत असते. पावसाअभावी यंदा जिल्ह्यातील कडधान्य पिकाचे क्षेत्र घटणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, उशीरा जरी पाऊस झाला तर या पिकाऐवजी अन्य पिकांचे क्षेत्र वाढणार आहे. मृग नक्षत्र सुरूवातीला जिल्ह्यात पावसाने जोरदार सलामी दिली. मात्र, त्यानंतर पाऊस गायब झालेला आहे. मृग जवळजवळ कोरडा गेल्याने आता आर्द्रा नक्षत्रावर शेतकऱ्यांची भिस्त आहे. आर्द्रा नक्षत्रात मोठा पाऊस पडणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात झालेला पाऊस असा
अकोले (१.४२), संगमनेर (१.०१), राहुरी (०.८३), नेवासा (०.५६), कोपरगाव (१.१४), राहाता (४.९), श्रीरामपूर (२.५५), नगर (१४.८८), शेवगाव (६.९३), पाथर्डी (१६.५२), पारनेर (२.५३), कर्जत (४.१६), श्रीगोंदा (७.३६), जामखेड (१२.३६) यांचा समावेश आहे.
पाऊस लांबल्याने जिल्ह्यातील कडधान्य पिकांचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. मात्र, त्याऐवजी बाजारी, सोयाबीनचे क्षेत्र वाढणार आहे. येत्या २५ तारखेनंतर पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. बागायत भागात कपाशीची लागवड सुरू झाली आहे.
-अंकुश माने,
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी