तृप्ती देसाई यांना शिर्डीत ‘नो एन्ट्री’
By | Updated: December 9, 2020 04:17 IST2020-12-09T04:17:00+5:302020-12-09T04:17:00+5:30
मंदिरात दर्शनासाठी येताना भाविकांनी सभ्यतापूर्ण वेशभूषा परिधान करून येण्याची विनंती संस्थानने भाविकांना केली होती. यासाठी कोणतीही सक्ती करण्यात आली ...

तृप्ती देसाई यांना शिर्डीत ‘नो एन्ट्री’
मंदिरात दर्शनासाठी येताना भाविकांनी सभ्यतापूर्ण वेशभूषा परिधान करून येण्याची विनंती संस्थानने भाविकांना केली होती. यासाठी कोणतीही सक्ती करण्यात आली नव्हती. या आशयाचे फलक मंदिर परिसरात लावण्यात आले होते. यावर तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेऊन संस्थानने हे फलक काढून टाकावे अन्यथा १० डिसेंबर रोजी शिर्डीत येऊन हे फलक काढून टाकण्याचा इशारा दिला होता.
तृप्ती देसाई यांच्या या इशाऱ्यानंतर शिर्डीतील शिवसेना, भाजप व मनसेच्या महिला आघाडीने संस्थानच्या निर्णयाचे समर्थन करीत तृप्ती देसाईचा निषेध केला होता. देसाई यांना प्रसंगी काळे फासण्याचा किंवा धडा शिकवण्याचाही इशारा महिला संघटना व स्थानिक महिलांनी दिला होता. सर्वच सामाजिक व राजकीय संघटनांनी देसाई यांनी शिर्डीत येऊन फलक काढून दाखवावे, असे प्रतिआव्हान दिले होते.
या सगळ्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी तृप्ती देसाई यांना ८ डिसेंबर ते ११ डिसेंबरदरम्यान शिर्डीत प्रवेश करण्यास मनाई केली आहे. शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक संजय सातव व निरीक्षक प्रवीणकुमार लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी सोमवारी सायंकाळी तृप्ती देसाई यांची पुण्यात त्यांच्या निवासस्थानी समक्ष भेट घेऊन नोटीस बजावली.
चौकट
१५ हजार भाविकांनी केले समर्थन
दरम्यान संस्थानने ३ डिसेंबर ते ७ डिसेंबरदरम्यान संस्थानने सभ्यतापूर्ण वेशभूषेबाबत प्रतिक्रिया नोंदविल्या. यात १५ हजार ५०६ भाविकांनी संस्थानच्या निर्णयाचे समर्थन केले तर ९३ भाविकांनी हा निर्णय अयोग्य असल्याचा अभिप्राय नोंदविल्याचे संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी सांगितले.