७६७ ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:37 IST2020-12-12T04:37:12+5:302020-12-12T04:37:12+5:30

अहमदनगर : राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला असून नवीन वर्षात जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. ...

The trumpet of 767 Gram Panchayat elections sounded | ७६७ ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला

७६७ ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला

अहमदनगर : राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला असून नवीन वर्षात जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठीची आचारसंहिता शुक्रवारपासून लागू झाली असून १५ जानेवारीला मतदान तर १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या राज्यातील एकूण १४२३४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि. ११) जाहीर केला. त्यात नाशिक विभागातील २४७६ तर नगर जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

राज्यात कोरोनाची स्थिती उद्भवल्यामुळे मार्चपासून डिसेंबरपर्यंत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका रखडल्या होत्या. त्या सर्व म्हणजे ७६७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता एकाच टप्प्यात होत आहेत. २३ डिसेंबरपासून अर्ज भरण्यास प्रारंभ होणार असून सर्व अर्जप्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. कोरोनाच्या अनुषंगाने राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यास आयोगाने सांगितले आहे.

सध्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये मतदार यादीचा कार्यक्रम सुरू असून १४ डिसेंबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. तसेच जिल्ह्यात १४ व १५ डिसेंबर रोजी सरपंचांची आरक्षण सोडत प्रक्रिया प्रत्येक तहसीलस्तरावर होणार आहे.

----------------

असा असेल ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम

अर्ज दाखल करण्याचा कालावधी - २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर (सकाळी ११ ते दुपारी ३)

अर्जांची छाननी - ३१ डिसेंबर

अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस - ४ जानेवारी २०२१

रिंगणातील उमेदवारांची अंतिम यादी तसेच चिन्ह वाटप - ४ जानेवारी

मतदान - १५ जानेवारी (वेळ ७.३० ते ५.३०)

मतमोजणी - १८ जानेवारी (तहसीलस्तरावर)

--------------

१८ जानेवारीपर्यंत आचारसंहिता

निवडणूक जाहीर झाल्यापासून म्हणजे ११ डिसेंबरपासून आचारसंहिता लागू झाली असून ती निकाल लागेपर्यंत म्हणजे १८ जानेवारीपर्यंत असणार आहे. या कालावधीत मतदारांना प्रलोभन दाखविणारी कोणतीही कृती मंत्री, खासदार, आमदार, तसेच स्थानिक संस्थांचे लोकप्रतिनिधी यांना करता येणार नाही.

-------------------------

निवडणूक होणाऱ्या तालुकानिहाय ग्रामपंचायती

अकोले- ५२

कर्जत- ५६

नेवासा- ५९

पाथर्डी- ७८

राहाता- २५

श्रीरामपूर- २७

कोपरगाव- २९

राहुरी- ४६

संगमनेर- ९४

श्रीगोंदा- ५९

पारनेर- ८८

जामखेड- ४९

शेवगाव- ४८

नगर- ५७

----------------

एकूण ७६७

Web Title: The trumpet of 767 Gram Panchayat elections sounded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.