वनविभागाने लावलेली झाडे उपटून आदिवासींची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:25 IST2021-09-14T04:25:22+5:302021-09-14T04:25:22+5:30
लव्हाळी ओतूर येथील मारुती मंदिरात सभा घेऊन व वाजतगाजत माकप किसान सभेने मोर्चा काढत शेतातील वनविभागाची झाडे उपटून फेकत ...

वनविभागाने लावलेली झाडे उपटून आदिवासींची निदर्शने
लव्हाळी ओतूर येथील मारुती मंदिरात सभा घेऊन व वाजतगाजत माकप किसान सभेने मोर्चा काढत शेतातील वनविभागाची झाडे उपटून फेकत आंदोलनाची सुरुवात केली. आदिवासी शेतकरी कसत असलेली जमीन कसणाऱ्यांच्या नावे करण्यासाठीची प्रक्रिया देशभर सुरू आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी यासाठी विहित प्रक्रियेअंतर्गत वनाधिकार ग्राम समित्यांकडे अर्ज केले आहेत. किसान सभेच्या पुढाकाराने शेतकऱ्यांची वनप्रकरणे पात्र करण्यासाठी अपिले दाखल करण्यात आली आहेत. असे असताना कोणत्याही आदेशाची किंवा अंतिम निकालाची वाट न पाहता वनविभाग आदिवासींच्या शेतात अशा प्रकारे घुसणार असेल तर आदिवासींना वनविभागाच्या कार्यालयात घुसावे लागेल, असा इशारा किसान सभेचे कॉम्रेड नामदेव भांगरे यांनी दिला आहे. पावसात सवाद्य काढण्यात आलेल्या मोर्चात अभयारण्य परिसरातील २३ गावचे शेतकरी सहभागी झाले होते. वनविभागाने शेतात झाडे लावण्याची आगळीक करून पुन्हा अभयारण्य परिसरातील वातावरण कलुषित करण्याचे प्रयत्न केले आहेत. वनविभागाचे असे प्रयत्न खपवून घेणार नसल्याचा इशारा किसान सभेने दिला आहे. नामदेव भांगरे, सदाशिव साबळे, राजू गंभीरे, एकनाथ मेंगाळ, भीमा मुठे, लक्ष्मण घोडे, भाऊसाहेब साबळे, शिवराम लहामटे, मधुकर नाडेकर, भास्कर बांडे, किसन बांडे आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले.