दोन दिवसात आदिवासी कुटुंबांना मिळणार शिधापत्रिका
By Admin | Updated: September 22, 2015 00:22 IST2015-09-22T00:17:18+5:302015-09-22T00:22:36+5:30
अहमदनगर : शासनाच्या अनास्थेमुळे गणेशवाडी (जखणगाव, ता. नगर) येथील आदिवासी कुटुंबे शिधापत्रिकेपासून वंचित असल्याचे वृत्त आज ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध होताच शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली.

दोन दिवसात आदिवासी कुटुंबांना मिळणार शिधापत्रिका
अहमदनगर : शासनाच्या अनास्थेमुळे गणेशवाडी (जखणगाव, ता. नगर) येथील आदिवासी कुटुंबे शिधापत्रिकेपासून वंचित असल्याचे वृत्त आज ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध होताच शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. दुर्लक्षीत गणेशवाडीत आज सकाळीच ही यंत्रणा पोहोचली. दोन दिवसात या आदिवासी कुटुंबांना शिधापत्रिका मिळवून देऊ, असे आश्वासन तहसीलदार सुधीर पाटील यांनी देऊन तत्काळ त्याची कार्यवाही सुरू केली.
जखणगाव शिवारात गणेशवाडी ही आदिवासींची वस्ती आहे. वर्षानुवर्षे हे कुटुंब मोलमजुरी करून तेथे वास्तव्यास आहेत. मात्र यातील बहुतांशी कुटुंबांकडे शिधापत्रिकाच नसल्याने त्यांना शासकीय योजना, शिष्यवृत्ती व इतर लाभांपासून वंचित राहावे लागे. शिधापत्रिका मिळविण्यासाठी आदिवासींनी शासनाची दारे झिजवली. मात्र, त्यांचा ‘आवाज’ शासनाला ऐकूच आला नाही. ‘लोकमत’ने सोमवारी शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे या आदिवासी कुटुंबांची करूण कहानी प्रसिद्ध करताच, मंगळवारी सकाळीच ही यंत्रणा या वस्तीपर्यंत पोहोचली. तेथील कुटुंबाची माहिती घेऊन शिधापत्रिका नसणारी ३७ कुटुंबांची यादी तहसीलदार पाटील यांनी तयार करून घेतली. विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्ती व इतर योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांना बोनाफाईड प्रमाणपत्र तयार करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या. सर्व बाबींची पूर्तता करून या आदिवासी कुटुंबांना दोन दिवसात शिधापत्रिका मिळवून देण्याचे आश्वासन पाटील यांनी देऊन त्याबाबतची कार्यवाही मंडलाधिकारी व तलाठी यांना करण्याचे आदेश दिले. या वस्तीमधील एकही कुटुंब शिधापत्रिकेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या.
(तालुका प्रतिनिधी)