रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वृक्षे गेली वाळून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:18 IST2021-01-17T04:18:20+5:302021-01-17T04:18:20+5:30
नवीन रस्त्यावरील झाडांची कत्तल केल्यानंतर वृक्षप्रेमींनी आवाज उठवला. त्यानंतर राजूर ते बारीदरम्यानच्या रस्त्यावर यावर्षी पावसाळ्यात जंगली झाडे लावण्यात आली. ...

रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वृक्षे गेली वाळून
नवीन रस्त्यावरील झाडांची कत्तल केल्यानंतर वृक्षप्रेमींनी आवाज उठवला. त्यानंतर राजूर ते बारीदरम्यानच्या रस्त्यावर यावर्षी पावसाळ्यात जंगली झाडे लावण्यात आली. पाऊस पडत असल्याने त्यावेळी ही झाडे हिरवीगार दिसत होती. मात्र, झाडांभोवती काटेरी कुंपण घालण्यात आले नव्हते. त्यामुळे रस्त्याच्या कडेला जनावरे चारली जात असल्याने यातील काही झाडे जनावरांनी खाल्ली होती. तरीही यातील काही झाडांना पुन्हा पालवी फुटली होती.
पावसाळा संपला आणि संबंधितांचे या झाडांकडे दुर्लक्ष होऊ लागले. मुरमाड जागेवर असलेली अनेक झाडे वेळेत पाणी मिळत नसल्याने वाळून गेली आहेत. तर उंची असलेली लावण्यात आलेल्या अनेक झाडांना आधार दिला नसल्याने वाचलेल्या काही झाडांचे शेंडे जमिनीला टेकले आहेत. अनेक ठिकाणी काही अंतरावरील झाडे वाळून गेल्याने रस्त्याची एक बाजू उजाड दिसू लागली आहे. वड, पिंपळ, कडुलिंब काही जंगली झाडे अद्यापही सुस्थितीत आहे. या झाडांना वेळेत पाणी देण्यात यावे. त्यांना काटेरी कुंपण करण्यात यावे. वाळलेल्या झाडांच्या जागेवर पुन्हा नव्याने झाडे लावण्यात यावी, अशी मागणी निसर्ग प्रेमी करत आहेत.
..............
या रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वी गरज नसतानाही काही झाडे तोडण्यात आली. शेकडो वर्षांची ही निसर्ग संपदा लोप पावली. यानंतर पावसाळ्यात झाडे लावण्याचा प्रयत्न झाला. हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला असला तरी या झाडांची काळजी घेतली गेली नसल्याने यातील अनेक झाडे वाळून गेली. जिवंत असलेल्या झाडांना किमान सहा दिवसांतून एकदा पाणी मिळाले तरच ही झाडे जगातील अन्यथा हा रस्ता उजाड दिसेल.
- रमाकांत डेरे, वृक्षप्रेमी
१६ राजूर