आंबीत घरावर कोसळले झाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:18 IST2021-03-24T04:18:09+5:302021-03-24T04:18:09+5:30
राहुरी : गेल्या दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने प्रवरा पट्ट्यातील शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कांदा, मका, काढणीला ...

आंबीत घरावर कोसळले झाड
राहुरी : गेल्या दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने प्रवरा पट्ट्यातील शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कांदा, मका, काढणीला आलेला गहू , हरभरा आदी पिके भुईसपाट झाली आहेत. फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने आंबी (ता. राहुरी) येथील दोन चारी परिसरातील बाबासाहेब येवले यांच्या राहत्या घरावर लिंबाचे झाड कोसळून स्वयंपाक खोलीचे मोठे नुकसान झाले.
सुदैवाने खोलीत कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र येवले यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. रविवार व सोमवारी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून गारपिटीने कांदा पाती अक्षरशः तुटून पडल्या आहेत. महसूल, कृषी विभागाने या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना अस्मानी संकटाची नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
...
अवकाळी पाऊस व गारपिटीने आंबी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी. याकामी आंबी ग्रामपंचायत सर्वतोपरी सहकार्य करेल.
-सुभाष डुकरे, ग्रामपंचायत सदस्य, आंबी.
....
कृषी सहाय्यक अरुण राजभोज यांच्यासमवेत नुकसानग्रस्त पिके व घराचे स्थळ निरीक्षण केले आहे. तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्याशी चर्चा करून प्रशासनाच्या आदेशाने पंचनामे करण्याबाबत कार्यवाही करण्याची दक्षता घेतली जाईल.
-रूपेश कारभारी, तलाठी, आंबी.